नांदेड- महाविकास आघाडी सरकारने ७ मे २०२१ रोजी निर्णय घेऊन मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण संपुष्टात आणले आहे. या निर्णयास ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने विरोध दर्शवून हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली आहे. जिल्हाध्यक्ष किरण फुगारे यांनी सुप्रीम कोर्टाने पदोन्नतीतील आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने मागासवर्गीय कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करून त्यांच्या शिफारसी लक्षात घेऊन पदोन्नतीत आरक्षण देण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
कोरोनामुळे कॅटरिंग व्यवसाय अडचणीत
नांदेड - मागील दोन वर्षांपासून शहरातील कॅटरिंग व्यवसाय अडचणीत आला आहे. कोरोनामुळे अनेक व्यवसाय कोलमडले आहेत. अनेकांचा राेजगार गेला आहे. मागील उन्हाळ्यात तसेच यंदाही उन्हाळ्यातील लग्नसराईवर कोरोनाचे संकट ओढावले. शासनाच्या निर्देशानुसार वऱ्हाडी मंडळीची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे लग्नसराईशी जुळलेल्या डेकोरोनश, कॅटरिंग व्यवसाय जवळपास बंदच आहे.
भीमघाटावर श्रमदान
नांदेड - वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भीमघाट येथे श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्याम निलंगेकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य बाबाराव नरवाडे, संजय वाघमारे, राहुल गजभारे, अनिता भोळे, सचिन नवघडे यांची उपस्थिती होती. संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान करण्यात आले. यात यशवंत थोरात, ॲड. नितीन थोरात, पवन जोंधळे, विजय थोरात, रेखा चौंदते, सम्यक भोसले, संदीप सितळे आदींनी सहभाग घेतला.
पाणी उपलब्धतेसाठी भूजल स्त्राेत पुनर्भरण कार्यशाळा
नांदेड - पाणी उपलब्धतेसाठी सिंचन विहीर, विंधन विहीर बळकटीकरण व भूजल स्त्रोतांचे पुनर्भरण या विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी प्रशिक्षण दिले.
महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी
नांदेड - महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त सिडको परिसरातील राज कार्नर भागातील पुतळा येथे महाराणा प्रतापसिंह महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रकाशसिंह परदेशी, महेश ठाकूर, नरेंद्रसिंह बयास, नीरज चव्हाण, सचिनसिंह चौहान, सुषमा ठाकूर, गोविंदसिंह ठाकूर, सोनू ठाकूर, गजाननसिंह चंदेल, ग्यानीसिंह ठाकूर, सोमेश ठाकूर, नीरज तौर, अभिजितसिंह बैस, शिवदयाल ठाकूर आदी उपस्थित होते.
बियाणे, खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी पथके स्थापन करा
नांदेड- खरीप हंगाम तोंडावर आला असून कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी वाढवलेले खताचे दर, बाजारातील सोयाबीन बियाण्याची उपलब्धता व मागणी या गोष्टीचा विचार करून बोगस बियाणे व बाजारातील काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र यंत्रणा स्थापन करून भरारी पथकांची निर्मिती करावी, अशी मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
मागील वर्षी नांदेड जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाणांमुळे बहुतांश भागात बियाणांची उगवण झाली नाही. काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला होता. जिल्ह्यात असंख्य तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर यंदा बाजारात खत, औषध व बियाणांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठाेर करावी करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष भागवत देवसकर यांनी केली आहे. निवेदनावर ज्ञानोबा गायकवाड, विजयराव चव्हाण, प्रशांत आबादार, पांडुरंग पोपळे, विनीत पाटील, सतीश चव्हाण आदींच्या सह्या आहेत.