नांदेड : संत गुरू रविदास महाराज यांचा जयंती महोत्सव १५ फेब्रुवारी रोजी सिडको येथील गुरू रविदासजी महाराज मंदिरात भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
मराठवाड्यात १५ ते १८ला पावसाचा अंदाज
नांदेड : मराठवाड्यात १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. केरळ किनारपट्टीलगतच्या अग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर मध्य महाराष्ट्रातील चक्रीय चक्रवातापर्यंत कमी दाबाचा पट्टा आता केरळ किनारपट्टी ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे.
ऑटोरिक्षा चालकांवर आर्थिक संकट
नांदेड : इंधन दरवाढीने ऑटोरिक्षा चालकांपुढे कुटुंबाचा गाढा ओढण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील काळात कोरोनामुळे सुरू असलेल्या लाॅकडाऊनमध्ये सात महिने ऑटोरिक्षा बंद होते. आता सुरू झाले आहेत, तर पेट्रोलचे भाव वाढले आहेत. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
सरपंचपदी ढगे
नांदेड : तालुक्यातील फत्तेपूर ग्रामपंचायत सरपंचपदी राजेश ढगे, तर उपसरपंचपदी मोतीराम संगेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी तथा मंडळ अधिकारी गजानन नांदेडकर यांनी घोषित केले. एकूण सात जागांसाठी निवडणूक घेण्यात आली.
महिला लोकशाही दिन
नांदेड : समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी १५ फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाहीदिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर, तसेच सदस्य सचिव यांनी केले आहे.
एक तारखेस वेतन केल्यास पाय दुधाने धुणार
नांदेड : शासन निर्णयानुसार शिक्षकांचे पगार दरमहिन्याच्या १ तारखेला करण्यात आल्यानंतर निश्चित जि. प. शिक्षण विभागाच्या प्रशासनाचे पाय दुधाने धुवून त्यांचे आभार व्यक्त करणार असल्याचे आसचे प्रांताध्यक्ष युवराज पोवाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. वेतना संदर्भात अनेकदा निवेदन देण्यात आले होते.
हणमंत पुयड सरपंचपदी
नांदेड : तालुक्यातील पुणेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हणंमत संभाजीराव पुयड, तर उपसरपंचपदी सुभद्राबाई नागोराव पुयड यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार दीपक मरळे यांनी घोषित केले.
मृत गायीवर अंत्यसंस्कार
नांदेड : सिडको परिसरातील एनडीवन संत नरहरी महाराज मंदिर परिसर भागातील अंतर्गत रस्त्यावर मृत अवस्थेत पडलेल्या गायीवर स्वच्छता कर्मचार्यांनी विधीवर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले. ही घटना ११ फेब्रुवारी राेजी दुपारी चार वाजता घडली.
वीरभद्र मिरेवाड यांना पुरस्कार प्रदान
नांदेड : पुणे येथे पार पडलेल्या अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात येथील साहित्यिक वीरभद्र मिरेवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे, बालभारतीचे किरण केंद्रे, डाॅ. संगीता बर्वे, डाॅ. न. म. जोशी, आदी उपस्थित हाेते.