नांदेड : जुन्या नांदेडातील चाैफाळा ते जुना मोंढा या रस्त्यावर किरकोळ व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांनाही मार्ग काढण्यास अडचण होत आहे. फुटपाथ तर या भागात रिकामे राहिलेच नाहीत. मनपा पथकाने या भागात मोहीम राबविण्याची मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.
कमी दाबाने पाणी
नांदेड : छत्रपती चौक ते डिमार्ट परिसरातील बहुतांश नगरांमध्ये उच्च दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी टँकर बोलवावे लागत आहेत. या भागातील पाणीपुरवठ्यासाठी लोकमित्रनगर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठे जलकुंभ उभारण्यात आले आहे.
मद्यपींचा धुमाकूळ
नांदेड : शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या कॅनॉल रस्त्यावरील मद्यपींचा बंदोबस्त करण्यात भाग्यनगर पोलिसांना अपयश आले आहे. शेतकरी पुतळ्यापासून मालेगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी वाईन आणि बिअर शॉप आहेत. मद्यपी दारू घेऊन कॅनॉल रस्त्याच्या फुटपाथवर बस्तान मांडत आहेत.
स्वच्छतेकडे दुर्लक्षच
नांदेड : महापालिकेकडून स्वच्छतेचा गवगवा केला जात असला तरी शहरातील बहुतांश ठिकाणी नाकाला रूमाल लावल्याशिवाय नागरिक पुढे जाऊ शकत नाहीत. व्हीआयपी रस्त्यावरील गोडावून परिसर आणि राज कॉर्नर ते भाग्यनगर ठाणे रस्त्यावर याहून वेगळी परिस्थिती नाही.
हिंगोली गेट पुलाखाली अंधार
नांदेड : हिंगोली गेट पुलाखालून मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. परंतु, या ठिकाणी असलेले वीजदिवे मागील अनेक वर्षांपासून बंद आहेत. परिणामी रात्रीला याठिकाणी अंधार असतो. हे पथदिवे आणि पुलाखाली बसविण्यात आलेले वीजदिवे नव्याने बसवून हा परिसर अंधारमुक्त करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
व्यसनमुक्ती अभियान
नांदेड : परिवार संस्था, नांदेड व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे तंबाखू नियंत्रण व्यसनमुक्ती अभियान नुकतेच संपन्न झाले. अध्यक्षस्थानी डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, तर मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अभिजीत संगवी, आलेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
खड्ड्यामुळे अपघात
नांदेड : पाईपलाईन टाकण्यासाठी काबरानगर रस्त्यावर खोदकाम केलेल्या ठिकाणी डांबरीकरण न केल्याने मोठा खड्डा पडला आहे. परिणामी, बजाजनगर काॅर्नर ते मोरया हाईट्सदरम्यान अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही हा खड्डा बुजवून रस्ता दुरूस्त करण्याची तसदी महापालिका प्रशासनाने घेतलेली नाही.
नांदेड शहर खड्डेमुक्त कधी होणार?
नांदेड : नांदेड शहर खड्डेमुक्त कधी होणार, याबाबतचे उत्तर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासनाने द्यावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले. गुरूत्तागद्दी काळात शहरात झालेल्या विकासानंतर आजतागायत मनपाच्या रस्त्याचा प्रगती अहवाल हा गुत्तेदारधार्जिणा आहे. त्यात जनतेला खड्ड्यांचा जो त्रास होत आहे, तो नांदेडकर नागरिक रोजच पाहात आहेत.
जड वाहनांना प्रवेश बंदी करण्याची मागणी
नांदेड : शहरातील चैतन्ननगर ते पीरबुर्हाण या मार्गावर जड वाहने सर्रास ये - जा करत असून, त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन या रस्त्यावरून जड वाहनांना रहदारी करण्यास मज्जाव करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
केळीच्या पानावर किडींचा प्रादुर्भाव
नांदेड : केळी पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. केळी पिकावर ठिपके आढळून आल्यास रोगग्रस्त पाने किंवा पानाचा भाग काढून टाकावा व बागेबाहेर आणून तो नष्ट करावा. ठिपके दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बागेत वाळलेली पाने, झाडावर लटकणारी पाने काढून टाकावीत व बाग स्वच्छ करावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.