लोहा : शहरातील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी ( दि. १८ ) या रत्यावर फुलांचा वर्षाव करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
लोहा शहरातून नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 जातो. या महामार्गावर नांदेड ते लोहा दरम्यान प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यात लोहा शहरातून जाणाऱ्या महामार्गाची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. खड्यामुळे या मार्गावर अपघाताचे आणि वाहनांच्या बिघाडाचे प्रमाणही मोठ्याप्रमाणात वाढले आहे. अपघातामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले. तर यावरून पादचाऱ्यांना चालणेही जिकरीचे झाले आहे. यामुळे शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नरंगले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शनी मंदिर ते शिवाजी चौक अशी रॅली काढून मार्गातील खड्ड्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
तसेच आंदोलकांनी आमदार व खासदार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास खड्ड्यातील पाण्याने आंघोळ घातली. आंदोलनात श्यामभाऊ कांबळे, सदाशिव गायकवाड, संतोष पाटील गवारे, एस. एन. शिनगारपुतळे, सतीश अनेराव, शेख एजाज, मारोती राठोड, प्रेमानंद गायकवाड, भास्कर कदम, निहाल अहेमद, दयानंद कदम, बबन जोंधळे, मोशीन बागवान, गौतम गायकवाड, उद्धव वाघमारे, शेख राऊफ, राजीव सोनकांबळे आदींचा सहभाग होता.