रामेश्वर काकडे /नांदेड बाजारातील वाढती मागणी लक्षात घेवून व शेतमालाला मिळत असलेला अल्प दर याचे चिंतन करुन पारंपरिक शेतीला फाटा देत राजेश गुंडले या शेतकर्याने साडेचार एकरात शेवग्याची लागवड केली. एकीकडे दुष्काळात हैराण झालेले शेतकरी पाहत असताना दुसरीकडे कमीत कमी पाण्यावर अधिक उत्पादनासाठी आधुनिक शेतीची कास धरणारे शेतकरीही परिसरात पहावयास मिळत आहेत. देळूब बुद्रुक (ता. अर्धापूर) येथील शेतकरी राजेश गुंडले यांच्याकडे २९ एकर बागायती शेती आहे. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही केळी, हळदी, सोयाबीन, कापसाचे पीक साथ देत नसल्याने त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निश्चय केला. त्यांनी साडेचार एकरात शेवग्याची लागवड केली असून उर्वरित शेतीमध्ये ऊस, हळद, केळी आहेत. कमी पाण्यावर कमी खर्चात आणि कमी दिवसांत येणारे नगदी पीक म्हणून शेवगा ओळखला जातो. गुंडले यांनी १७ जुलै २0१४ रोजी शेवग्याची १0 बाय ४ या फुटावर लागवड केली.एका एकरात १0८९ झाडे लावली आहेत. शेवग्याचे बियाणे उस्मानाबाद येथून आणले. एका एकरात १ किलो बियाणे लागते. प्रति किलो २५00 रुपये असा दर आहे. लागवड केल्यानंतर साडेपाच महिन्यांनी शेंगा लागण्यास सुरुवात झाली. सध्या एका झाडाला ६0 ते ७0 शेंगा लगडल्या आहेत. म्हणजेच ६ ते ७ किलो होतात. सदर शेंगा जून ते जुलैपर्यंत येतात.एकदा लागवड केल्यानंतर किमान १0 वर्षे झाडे लावण्याची गरज नाही. त्याची वेळोवेळी छाटणी करावी लागते. वर्षभरात किमान ७0 टन शेंगा निघत असल्याने २४ लाखांचे उत्पादन घेण्याचा मानस राजेश गुंडले यांनी 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केला. सध्या बाजारात शेंगाला ५0 ते ५५ रुपये किलो दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात ७५ ते ८0 रुपये किलो विकल्या जातात. शेंगाची लांबी २ ते ३ फुटापर्यंत असून ११ शेंगा एक किलो बसतात. सध्या नांदेडच्या बाजारात विक्रीसाठी आणल्या जात असून यानंतर पुणे, मुंबई, नागपूर या शहरात विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याचे गुंडले यांनी सांगितले. शेवग्याची लागवड कापसासारखी टोन पद्धतीने केलेली आहे. त्यासाठी दर महिन्याला डीएपी, पोटॅश या खताची मात्रा प्रति झाडा १00 ग्रॅम तीन महिन्यांपर्यंत देण्यात आली. तर चौथ्या महिन्यांपासून प्रतिझाड ३00 ग्रॅम बहार घेईपर्यंत द्यावी लागते. १५ ते २0 दिवसाला फवारणी करावी लागते. यासाठी कमी पाणी लागत असून ८ ते १0 दिवसाला केवळ २ तास ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. सदर पानांची दर महिन्याला छाटणी करावी लागते. त्यामुळे झाडे उंच न वाढता त्याचा विस्तार होतो, वादळी वार्याचा त्यावर म्हणावा तेवढा परिणाम होत नाही.त्यामध्ये वेलवर्गीय टरबूज, टोमॅटो, काकडी, वांगी हे आंतरपिके घेता येत असल्याने त्यात येत्या काही दिवसांत टरबूज व टोमॅटोची लागवड करण्यात येणार असल्याचेही गुंडले म्हणाले. बियाणे खते आणि औषधाचा एकरी ५ हजार रुपये खर्च आल्याचेही त्यांनी सांगितले. |
साडेचार एकरात शेवग्याची लागवड
By admin | Published: January 28, 2015 2:09 PM