नांदेड : शहरातील प्रमुख चाैकांमध्ये असलेली दारू दुकाने नागरिकांसह इतर व्यावसायिकांची डोकेदुखी ठरत आहेत. दारू दुकानातून दारू घेऊन बाजूलाच बसून रिचविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात कोरोना नियमावलीपासून तर दुकानदार प्लास्टिक ग्लास, चकणाही देत आहेत.
कोरोनामुळे हाॅटेल, बारला नियमावली घालून देण्यात आली आहे. याचाच फायदा घेत दुकानदार रस्त्यावर दारू उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी विशेष कर्मचारीही नियुक्त केले आहेत. त्यामुळे फुटपाथ, रस्त्यावर, तसेच मोकळ्या जागेत बसून दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
शहरातील व्हीआयपी रस्त्यावर अण्णाभाऊ साठे चौक परिसरात असलेल्या वाइन शॉपमधून दारू खरेदी करून फुटपाथवर बसूनच दारुडे आपली शाळा भरवत आहेत.
पोलीस ठाणे : शिवाजीनगर
भाग्यनगर ठाण्याच्या तिन्ही बाजूंनी जवळपास दहा ते बारा वाइन, बीअर शॉपसह बीअर बार आहेत. त्यामुळे या भागातील फुटपाथ अन् रस्त्यालगत मद्यपी राजरोसपणे बाटली रिचवितात.
हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे : भाग्यनगर
महात्मा फुले मार्केट परिसरात असलेल्या वाइन शॉपवरून दारू घेऊन लगेचच प्लास्टिकचा ग्लास अन् हातात चार फुटाणे घेऊन फुटपाथवर दारू पिणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे : शिवाजीनगर,
आनंदनगर चाैकात असलेल्या दारू दुकानामुळे महिलांना मोठा त्रास होतो. अनेक वेळा छेडछाड, चोरीच्या घटना घडत आहेत. वारंवार तक्रारी केल्या; परंतु उपयोग होत नाही.
-संदीप नरवाडे, नागरिक
छत्रपती चाैक परिसरातील दारू दुकानामुळे कॅनाॅल रस्त्याच्या फुटपाथवर दारूचे अड्डे झाले आहेत. रस्त्यावर दारू पिणाऱ्या व्यक्तींवर कारवाई आवश्यक आहे.
-अरुण पोपळे, नागरिक
संबंधित ठाण्यांना कारवाईच्या सूचना
कोरोनामुळे पार्सल सुविधा होती. त्यात काही नागरिक फुटपाथवर दारू पीत आहेत, अशा तक्रारी असून, त्यासंदर्भात कारवाईच्या सूचना ठाण्यांना दिल्या आहेत.
-प्रमोदकुमार शेवाळे, पोलीस अधीक्षक