मुंबई : गेल्या महिन्यात झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघातून निवडून आलेले निवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर दगडुजी शिंदे यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुद्ध नोंदविलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याची माहिती न दिल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जावी, अशी विनंती राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना करण्यात आली आहे.शेतकरी कामगार पक्षातर्फे विजयी झालेले एकमेव उमेदवार असलेल्या शिंदे यांनी नंतर भाजपसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ठाणे येथील एक सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी शिंदे यांच्याविरुद्ध ही तक्रार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे. त्यांची निवडणूक रद्द करण्याखेरीज त्यांच्यावर फौैजदारी कारवाई करण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे.वाटेगावकर यांच्या म्हणण्यानुसार, ओशिवरा येथील भूखंड घोटाळ्याच्या संदर्भात तपास करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या ‘एसआयटी’ने केलेल्या तपासानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सन २०१७ मध्ये भ्रष्टाचार निर्मूलन कायदा तसेच भारतीय दंड विधानान्वये गुन्हा नोंदविला. त्यात समीर व पंकज भुजबळ यांच्याखेरीज श्यामसुंदर शिंदे यांनाही आरोपी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पंकज भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघातून आताची विधानसभा व समीर भुजबळ यांनी नाशिक मतदारसंघातून गेली लोकसभा निवडणूक लढविताना उमेदवारी अर्जांसोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रांत या गुन्ह्याची स्पष्ट नोंद केली आहे. मात्र त्याच प्रकरणात सहआरोपी असूनही शिंदे यांनी मात्र निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात या गुन्ह्याची माहिती दडवून ठेवली आहे.अंजली दमानिया यांनी केलेल्या जनहित याचिकेवर ज्या एकूण ११ प्रकरणांच्या तपासाचा आदेश उच्च न्यायालयाने दिला त्यात ओशिवºयाचे हे प्रकरण आहे. या प्रकरणाच्या तपासात हेतुपुरस्सर चालढकल करण्यात येत असल्याबद्दल वाटेगावकर यांनी स्वतंत्र जनहित याचिका केली आहे.
श्यामसुंदर शिंदे यांनी गुन्ह्याची माहिती दडविल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 4:04 AM