मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी खासदार संभाजीराजे हे वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २० ऑगस्ट रोजी नांदेड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मराठा क्रांती मूक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आंदोलनाच्या तयारीच्या अनुषंगाने सर्व मराठा समाजबांधवांची नियोजन बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत २० ऑगस्ट रोजी आंदोलन कशा पद्धतीने पार पाडले जाईल, या संदर्भात चर्चा झाली. यावेळी सर्व मराठा समाजातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व प्रतिनिधीने आपले मनोगत व्यक्त केले व आम्ही वैयक्तिक या आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करू, असा एकमुखी नारा दिला. यावेळी सर्व १६ तालुक्यांतून व शहरातून सर्व समाज प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. सर्व तालुक्यावर नियोजन बैठका होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या आंदोलनास कुठलेही गालबोट लागणार नाही, कोरोना परिस्थितीचे गांभीर्य राखून शासनाने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्ती आंदोलनादरम्यान पाळल्या जातील तसेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून आंदोलन यशस्वीरीत्या पार पाडण्याची शपथ मराठा कार्यकर्त्यांनी घेतली.
मराठा क्रांती मोर्चाने घालून दिलेला आदर्श स्मरणात ठेवून, २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या मूक आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.