नांदेड : माहूर तालुक्यातील अंजनी येथे व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करताना इलेक्ट्राॅनिक वजनी काट्यात फेरफार करून मापात पाप केले. एक क्विंटल कापसाच्या मागे साधारणता १० किलो कापूस जास्त घेऊन शेतकऱ्यांना ११ लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कृषी कायद्याच्या विरोधात सध्या देशभरात आंदोलन सुरू आहे. त्यात शेत मालाला भावही मिळत नाही. त्यामुळे मागेल त्या व्यापाऱ्याकडे शेतकरी आपला माल घेऊन जात आहेत. अंजनी येथील शेतकऱ्यांनी रबी हंगामातील कापूस विक्रीसाठी आणला होता. यावेळी व्यापाऱ्याने त्यांना योग्य भाव देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कापूस खरेदी केला. त्यासाठी इलेक्ट्राॅनिक काट्याचा वापर करण्यात आला; परंतु काट्यात त्यासाठी फेरफार करण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक क्विंटलमागे शेतकऱ्याचा साधारणता दहा किलो कापूस अधिक जात होता. अशाप्रकारे व्यापाऱ्याने जवळपास ९०० क्विंटल कापूस खरेदी केला; परंतु काट्यातील ही फेरफार गजानन मेश्राम या शेतकऱ्याच्या लक्षात आली. त्यांनी या प्रकरणात माहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वणवण सुरूचपरतीच्या पावसाने अगोदरच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सोयाबीन, मूग, उडीद यासह हातात असलेली पीके वाया गेली आहेत. त्यात आता पांढऱ्या सोन्याने कसा बसा हातभार लावला होता. परंतु त्यालाही भाव पाडून मागण्यात येत आहेत. बाजारपेठेत हा कापूस विक्रीसाठी नेल्यानंतर व्यापाऱ्यांकडून अशाप्रकारे लुट करण्यात येत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे इलेक्ट्रानिक काटे आहेत. त्यामुळे या सर्व काट्यांची तपासणी होणे गरजेचे आहे. काही ठिकाणी व्यापार्यांनी अशाप्रकारे काट्यात फेरफार केल्याची शक्यता नाकारता येत नाही.