लोहा (जि. नांदेड) - लांडगेवाडी येथे दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वयोवृध्द आईवडिलांवर उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने शासकीय रूग्णालयात दाखल केले परंतु आईचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंत्यविधीसाठीही पैसे नसल्याने इतरांकडे हात पसरण्याची वेळ मुलावर आली आहे. दरोडेखोरांच्या हाती किडुक मिडुक लागले असले तरी त्यासाठी कुटुंबातील महिलेला जीव गमवावा लागला आहे. ज्याच्या घरात अठरा विश्वे दारिद्र्य असताना त्याच्या घरावर दरोडा टाकून काय मिळणार याची पुसटशी कल्पनाही दरोडेखोरांना कशी आली नसेल किंवा दयामयाही कशी आली नसेल असा प्रश्न पडतो.
लोहा तालुक्यातील लांडगेवाडी येथे माजी सरपंच सोनबा लांडगे यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या गणेश चव्हाण यांच्या घरी २० नोव्हेंबरच्या मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला. दरोेडेखोरांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या आई-वडिलांवर उपचार करण्यासाठी गणेश यांनी अनेक राजकीय लोकांकडे हात पसरले परंतु नकारघंटा मिळाल्याने आईवडिलांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मदतीसाठी अनेक पुढाऱ्यांकडे पसरले हात- शुक्रवारी दुपारी आई विमलबाई चव्हाण यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलगा गणेश यांनी लोहा-कंधार, मुखेड मतदारसंघातील काही पुढाऱ्यांना अंत्यविधीसाठी आर्थिक मदतीची मागणी केली.- मात्र, पुढाऱ्यांनी त्या कुटुंबावर काही सहानुभूती मात्र दाखवली नसल्याचे मुलगा गणेश यांनी सांगितले.- विमलबाई चव्हाण यांच्या पश्चात सात मुली, दोन मुले, एक सून, नातवंडे असा परिवार असून शनिवारी दुपारी चारच्या सुमारास कंधार तालुक्यातील दुर्गा तांडा या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चोरटे अजूनही मोकाट !लांडगेवाडी परिसरातील घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, पोलिस अधीक्षक कृष्ण कोकाटे, सहायक पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय अधिकारी मारुती थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, माळाकोळी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप निलपत्रेवार हे दाखल झाले होते. घटनेला पाच दिवस झाले तरी चोरट्यांचा पत्ता अजूनही लागला नाही.