नांदेड : महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आली आहे. त्यातून बाहेर निघण्यासाठी आणि वीज बिलाच्या ५९ हजार काेटींच्या थकबाकी वसुलीसाठी ‘प्रकाशगड’ या महावितरण मुख्यालयातील सहा संचालकांना ऑन फील्ड परिमंडळामध्ये पाठविले जाणार आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी २२ जून राेजी या संबंधीचे आदेश जारी केले. या सहा संचालकांवर परिमंडळातील थकबाकी वसुली, चालू वीज बिलाची वसुली हाेते की नाही यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. महावितरणची एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळातील महसुली तूट ९ हजार २०४ काेटी एवढी हाेती. त्यात एप्रिल ते मे २०२१ या काळात आणखी १ हजार ७९२ काेटींची भर पडली असून तुटीचा हा आकडा १० हजार ९९६ काेटींवर पाेहाेचला आहे. महावितरणची व्याजासहित विद्युत बिलाची थकबाकी ५९ हजार ४३९ काेटी १८ लाखांवर हाेती. काेराेनाकाळात त्यात आणखी भर पडली आहे.
आयाेगाकडून ५४७८ काेटींची कपात
२०२०-२१ या वर्षात महावितरणने ८६ हजार ६५८ काेटी १६ लाख रुपयांच्या महसुलाची आवश्यकता नाेंदविली हाेती; परंतु वीज नियामक आयाेगाने त्यात ५ हजार ४७८ काेटींची कपात केल्याने महावितरणला केवळ ८१ हजार १८० काेटी १५ लाख रुपयांच्या महसुलालाच मंजुरी मिळू शकली. काेराेनाच्या सुमारे दीड वर्षाच्या काळात चालू विद्युत बिलाची वसुलीच न झाल्याने महावितरणचा थकबाकीचा आकडा प्रचंड वाढला आहे. खर्च मात्र कमी झालेला नाही. त्यामुळे महावितरणचा आर्थिक डाेलारा सांभाळण्याचे आव्हान उभे झाले आहे.
चाैकट.......
वीज परिमंडळनिहाय नियुक्त संचालक
संचालक वीज परिमंडळ
भालचंद्र खंडाईत (प्रकल्प) नागपूर, अमरावती, अकाेला
संजय ताकसांडे (संचालन) पुणे, बारामती, भांडूप
सतीश चव्हाण (वाणिज्य) कल्याण, नाशिक, जळगाव
प्रसाद रेशमे (कार्यकारी) गाेंदिया, चंद्रपूर
याेगेश गडकरी (कार्यकारी) काेकण, काेल्हापूर
अरविंद भादीकर (कार्यकारी) औरंगाबाद, लातूर, नांदेड