वीज चोरीला आळा बसावा यासाठी आकडे टाकून वीज वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत १९ जून रोजी मुखेड तालुक्यातील मौजे बाऱ्हाळी येथे कारवाई करत ६ वीजचोरांची ४५ हजार १७० रुपयांची वीजचोरी उघड करण्यात आली होती. चोरून वापरलेल्या विजेचे देयक व दंडाच्या रकमेचे वीज देयक संबंधितांना देण्यात येऊन वीज बिल भरण्याविषयी निर्देशित केले होते. मात्र, आकडे टाकून वीज वापरणारे हारून कासिमसाब तांबोळी एकूण रक्कम ७८८० रुपये, शेख युसूफ अहेमदसाब रक्कम ५१४० रुपये, खादर मौलीसाब शेख रक्कम ७१०० रुपये, खजासाब नबीसाब शेख रक्कम ७२२० रुपये, मुस्तफा रसूलसाब शेख रक्कम ८४२० रुपये आणि महेमूद मकबूलसाब शेख रक्कम ७४१० रुपये यांनी दिलेले देयक व दंडाची रक्कम विहीत वेळेत न भरल्यामुळे वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकडे टाकून विजेचा वापर करणे, शेजाऱ्याकडून अथवा अन्य मार्गाने विजेचा वापर करताना महावितरण कर्मचाऱ्यांना आढळून आल्यास संबंधित ग्राहकांवर विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येत आहे. यात थकबाकीदार ग्राहकाने शेजाऱ्याकडून विजेचा वापर केल्यास व शेजाऱ्याने परस्पर वीज पुरवठा केल्यास दोघांवरही कलम १२६ नुसार कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये शेजाऱ्याकडून मीटरही बंद होऊ शकते व आकडा टाकून विजेचा वापर करणे, वाहिनीमध्ये छेडछाड करणे अथवा अन्य मार्गाने विजेचा वापर केल्यास संबंधित ग्राहकांवर कारवाई करण्यात येते. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन संबंधितांना अटकही होऊ शकते. या वीज चोरीच्या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.