लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरात दोन वर्षांत शौचालयाचे जवळपास सहा हजार प्रस्ताव फेटाळले असून अनेकांनी शौचालय असतानाही प्रस्ताव दाखल केल्याची बाब तपासणीत निष्पन्न झाली़ त्यामुळे हे प्रस्ताव फेटाळल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे़महाराष्ट्र स्वच्छता अभियानांतर्गत नांदेड महापालिका हद्दीत २०१५ पासून १० हजार ६०६ शौचालय बांधकामाचे प्रस्ताव प्राप्त झाले होते़ यातील ४ हजार ६२५ प्रस्ताव महापालिकेने मंजूर केले़ तर ५ हजार ८९० शौचालयाचे प्रस्ताव फेटाळले आहेत़ महापालिकेकडे शौचालय बांधकामासाठी आॅनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयामार्फत त्या प्रस्तावांची तपासणी केली़ त्या तपासणीत तब्बल ५ हजार ८९० अर्ज फेटाळले असून बहुतांश अर्जधारकांच्या घरी पूर्वीच शौचालय असल्याची बाब स्पष्ट झाली आहे़ दोन वर्षांत महापालिकेने ४ हजार शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे़ शौचालय पूर्ण केल्याची बाब लाभधारकांनी फोटोसह आॅनलाईनवर अपलोड केली आहे़महापालिकेच्या इतवारा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वाधिक ४ हजार ६५३ शौचालयाचे प्रस्ताव फेटाळले आहेत़ त्याखालोखाल अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ५८१, तरोडा ५०२ आणि सिडको क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १५४ शौचालयाचे प्रस्ताव फेटाळले आहेत़ महापालिकेने मंजूर केलेल्या प्रस्तावांची संख्याही इतवारा क्षेत्रीय कार्यालयात सर्वात जास्त आहे़ येथे २ हजार २९० प्रस्ताव मंजूर केले आहेत़ अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ९६३, तरोडा ५४४ आणि सिडको क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ८३१ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे़महापालिकेने मंजूर केलेल्या ४ हजार ६२५ प्रस्तावांपैकी ४ हजार ४४९ प्रस्तावांसाठी पहिल्या टप्प्यातील रक्कम महापालिकेने अदा केली आहे़ ही रक्कम ३ कोटी ६४ लाख इतकी आहे़ महापालिकेने आतापर्यंत शौचालयासाठी ६ कोटी १५ लाख रुपये खर्च केला आहे़ शासनाकडे महापालिकेने शौचालय अनुदानासाठी आणखी ४ कोटींची मागणी केली असून त्यामध्ये झालेल्या खर्चासाठी २ कोटी व नवीन लाभार्थ्यांसाठी २ कोटी रुपयांचा समावेश आहे़ त्याचवेळी ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी शासनाकडे महापालिकेने ४ कोटींची मागणी केली आहे़शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून ४ हजार व राज्य शासनाकडून ८ हजार आणि महापालिकेकडून ५ हजार असे एकूण १७ हजार रुपये देण्यात येतात़ ही रक्कम तीन टप्प्यात देण्यात येते़ पहिला हप्ता ६ हजारांचा, दुसरा ५ आणि तिसरा ६ हजारांचा असतो़शहरात आजघडीला २३ सार्वजनिक शौचालय कार्यरत असून आणखी १० सार्वजनिक शौचालये प्रस्तावित करण्यात आली आहेत़ त्याचवेळी शहरातील पेट्रोलपंप, हॉटेल, शाळा, दवाखाने यांच्याकडूनही शौचालय खुले करून देण्याची सूचना करण्यात आली आहे़
सहा हजार प्रस्ताव फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:46 AM
नांदेड : शहरात दोन वर्षांत शौचालयाचे जवळपास सहा हजार प्रस्ताव फेटाळले असून अनेकांनी शौचालय असतानाही प्रस्ताव दाखल केल्याची बाब तपासणीत निष्पन्न झाली़ त्यामुळे हे प्रस्ताव फेटाळल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे़
ठळक मुद्दे स्वच्छ भारत अभियान : शहरात दोन वर्षांत ४ हजार शौचालय बांधकाम पूर्ण