नांदेड : राज्यात सरकार झोपेचे सोंग घेत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला काहीही देणेघेणे उरले नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केली़ बि-बियाणे व खताचे भाव आकाशाला भिडले आहेत. शेतक-यांचा सातबारा अद्याप कोरा झाला नाही. युती सरकारला जागे करण्यासाठीच संपूर्ण जिल्ह्यात आज धरणे आंदोलन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर गुरुवारी जिल्हाभरात धरणे आंदोलन करण्यात आले़ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे झालेल्या धरणे आंदोलनात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हेही सहभागी झाले होते़ यावेळी शेतकºयांच्या प्रश्नाकडे सरकारने पुर्णत: दुर्लक्ष केल्याची टीका त्यांनी केली़ पीक विम्याची रक्कम अनेक भागातील शेतकºयांना अद्यापही मिळाली नाही़ पीकविमा भरण्यासाठी शेतकºयांनी रांगा लावून कोट्यवधींची रक्कम भरली आहे़ प्रत्यक्षात शेतकºयांना भरलेल्या रकमेपेक्षाही अत्यल्प विमा मिळाला आहे़ पीक विम्यात कंपन्यांना मोठा नफा झाला आहे़ विमा कंपन्यांकडे शेतकºयांनी प्रिमियमपोटी ५८ कोटी रुपये भरले़ प्रत्यक्षात विम्याच्या रकमेपोटी केवळ १८ टक्के रक्कम मिळाली आहे़ याकडे सरकारने लक्ष देवून शेतकºयांना पीक विम्याची रक्कम मिळवून देणे गरजेचे आहे़ खरीप हंगाम सुरू होवून महिना उलटला तरी पीक कर्ज अद्याप वाटप झाले नाही़ शेतकºयांच्या प्रश्नावर सरकारला काही देणेघेणे नाही अशीच परिस्थिती आहे़ हे फडणवीसांचे नसून फसणवीसांचे सरकार आहे. केवळ घोषणा मागून घोषणा केल्या जातात पण त्याचा अंमलबजावणी मात्र होत नाही, ही बाब दुर्दैवी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सरकारने घोषित केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचे स्पष्ट झाले आहे़ दोन वर्षापूर्वी घोषित केलेल्या कर्जमाफीचा छदामही शेतकºयांना मिळाला नसल्याचे चव्हाण म्हणाले़नांदेड जिल्ह्यात प्रशासन आणि पुढाºयांनी एकत्र येत मोठी लुट सुरू केल्याचा गंभीर आरोपही चव्हाण यांनी केला़ प्रत्येक विभागात भ्रष्टाचारांना कुरण उपलब्ध झाले आहे़ कोणतीही ठोस कारवाई अधिकाºयांकडून होत नसल्याने भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे़ जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट असताना वाळूचे शेकडो ट्रक परराज्यात जात आहेत़ महसूल अधिकारी मात्र आपला वाटा घेवून मोकळे होत असल्याची टीकाही त्यांनी केली़ जिल्ह्याचा टंचाई आराखडा डिसेंबर महिन्यात तयार करण्यात आला, परंतु या आराखड्याच्या अंमलबजावणीची बैठक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात आली. त्यामुळे तीव्र दुुष्काळात सुध्दा शासनाकडून कांहीच उपाय योजना करण्यात आल्या नाहीत. जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईस सामोरे जावे लागले. यावेळी आ़डी़पी़सावंत यांनीही सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली़या आंदोलनात माजी राज्यमंत्री आ़ डी़पी़सावंत, आ़अमरनाथ राजूरकर, महापौर दीक्षा धबाले, मनपा सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, स्थायी समिती सभापती फारूखअली खान, अमित तेहरा, विलास धबाले, किशोर स्वामी, जि़प़च्या समाज कल्याण सभापती शिला निखाते, अनुजा तेहरा,माजी सभापती बी.आर.कदम, तालुकाध्यक्ष अॅड.निलेश पावडे, विठ्ठल पावडे, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, सभापती फारुख अली खान, सभापती प्रकाशकौर खालसा, सुखदेव जाधव, नरेंद्र चव्हाण, शैलजा स्वामी, विजय येवनकर, मसूद खान, साहेबराव धनगे, संतोष मुळे, संदीप सोनकांबळे, सुभाष पाटील, प्रशांत तिडके, बाळू राऊत, बापूराव खाकरे, विनय गिरडे पाटील, शमीम अब्दुल्ला आदींची उपस्थिती होती़माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील काँग्रेसच्या या धरणे आंदोलनात सहभाग घेतला व कार्यकर्त्यांना संबोधीत केले. त्यानंतर भोकर येथील आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी ते भोकरकडे रवाना झाले.्रकाँग्रेसचे गद्दार भाजपतकाँग्रेसचे अनेक गद्दार आज भाजपात दाखल झाले आहेत़ आज ते सत्ताधारी म्हणून मिरवत आहेत़ आज जे काँग्रेसमध्ये आहेत ते मनापासून काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत़ याच कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी काळात जिल्हा बळकावणा-यांना आम्ही जागा दाखवू, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला़राहुल गांधी यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आम्ही पदाला चिकटलेली माणसे नाहीत, असे सांगितले. राहुल गांधी यांनी लोकसभेतील पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्ष थांबणार नाही. सामान्य माणसाच्या प्रश्नाला पक्ष कायम आवाज देत राहील, असेही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारने घेतले झोपेचे सोंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:50 AM
राज्यात सरकार झोपेचे सोंग घेत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला काहीही देणेघेणे उरले नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केली़ बि-बियाणे व खताचे भाव आकाशाला भिडले आहेत.
ठळक मुद्देआंदोलन : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्षकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची टीका