उमरी : येथील नगरपालिकेतील एक ५६ वर्षीय अंगणवाडी सेविका आपल्या वृद्ध आईसह राहत होती. बुधवारी (दि. ५ ) पहाटे त्यांच्या आईचे निधन झाले. घरात त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही नसल्याने आणि कोरोनामुळे इतर कोणी पुढे न आल्याने आईवर अंत्यविधी कसा करायचा ही अडचण निर्माण झाली. ही माहिती नगरपालिकेत कळल्यानंतर स्वतः मुख्याधिकाऱ्यांनी अंत्यविधी करण्यास पुढाकार घेत वृद्धेच्या मृतदेहास खांदा देत आपले सामाजिक दायित्व पार पाडले.
शोभाबाई अग्रवाल (५६) या येथील नगरपालिकेत अंगणवाडी सेविका म्हणून अल्प मानधनावर कार्यरत आहेत. त्या १०० वर्ष वय असलेल्या त्यांच्या आई सुशीलाबाई बाबुलाल अग्रवाल यांच्यासोबत म्हाडा कॉलनीत राहत. सध्या कोरोना साथीच्या बिकट परिस्थितीत आजारी आईची सेवा करीत त्या दोघी कसेबसे दिवस काढत होते. बुधवारी अचानक सुशीलाबाई यांचे निधन झाले. घरात दोघींच्या शिवाय कुणीही कर्तापुरुष नाही. जवळपास रक्ताचे कुणीही नातेवाईक नाहीत. ना आप्तस्वकीय. अशा विचित्र स्थितीत अंत्यविधी कसा करायचा ? हा प्रश्न शोभाबाईसमोर उभा राहिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूचे शेजारीही पुढे येईनासे झाले.
ही माहिती नगरपालिकेच्या कार्यालयात समजली. त्याबरोबर मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेत अंत्यविधीची सर्व तयारी केली. एवढ्यावर न थांबता मुख्याधिकारी डोईफोडे यांनी मृतदेहास स्वतः खांदा देऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी संदानंद खांडरे, नगरसेवक बाळू शिंदे, न. प. कर्मचारी गणेश मदने, कुलदिप सवई, घनकचरा व्यवस्थापन कर्मचारी ईश्वर रणनवरे आदींची उपस्थिती होती.