नांदेड : शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतील मातीचे परीक्षण करून घेत खताची मात्रा दिल्यास खतावरील अनावश्यक खर्च टाळता येतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून पिकांना आवश्यकतेनुसार खताची मात्रा द्यावी व अतिरिक्त खर्च टाळावा, असे आवाहन राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्रातर्फे करण्यात आले आहे. नत्र, स्फुरद, पालाश हे मुख्य अन्नघटक यासोबतच कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक या दुय्यम अन्नद्रव्यांची तर लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन, मॉलीब्देनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांची आपल्या जमिनीत किती कमतरता आहे, याची माहिती माती परीक्षण केल्यानंतरच समजते. खताच्या असमतोल वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. जमिनीची सुपिकता कमी होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादकतेत घट येत व वारेमाप खतांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. माती नमुने गोळा केल्यानंतर ते तपासून त्याचा योग्य ते अहवाल शेतकऱ्यांना माती परीक्षण केंद्राकडून आरोग्य कार्डमार्फत देण्यात येईल. त्यावर आधारित खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांनी घ्यावीत. पिकांना आरोग्य कार्डनुसार खतांच्या मात्रा द्याव्यात व आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे, यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्रातर्फे केले आहे.
माती परीक्षणामुळे खताचा अनावश्यक खर्च होतो कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 4:15 AM