- शिवराज बिचेवारनांदेड :सोल्जर नेव्हर आॅफ ड्युटी असे अभिमानाने सांगणारे आमच्या देशातील सैनिक हे कधीच सुट्टीवर नसतात़ युद्ध असो किंवा नैसर्गिक आपत्ती देशावर आलेल्या प्रत्येकात संकटात आपला जीव धोक्यात घालून धावून येणारे हे सैनिकच असतात़ त्यामुळे अशा सैनिकाप्रती प्रत्येक भारतीयांचा ऊर अभिमानाने दाटून येतो़ नांदेड जिल्ह्यातही सुट्टीवर आलेल्या एका सैनिकाला कोरोनाच्या संकटामुळे अडकून पडण्याची वेळ आली़ परंतु सैनिकच तो संकटात रणांगणावर उतरणारच़ असाच काहीसा अनुभव नांदेडकरांना आला आहे़
सिकंदराबाद येथे लष्कराच्या इंजिनिअरींग रेजिमेंटचा जवान असलेले प्रविण देवडे हे ६ मार्च रोजी सुट्टीवर गावाकडे आले होते़ परंतु सुट्टी संपण्यापूर्वीच देशभर लॉकडाऊन झाला़ त्यामुळे लष्कराकडून जे सैनिक जिथे आहेत त्यांना येत्या १५ एप्रिलपर्यंत तिथेच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ सुरुवातीचे एक, दोन दिवस घरी काढलेल्या देवडे हे नंतर मात्र बेचैन होत होते़ देशात आलेल्या या संकटाच्या काळात सैनिक असताना आपण घरात कसे बसून राहू शकतो या विचाराने ते अस्वस्थ होत होते़ त्यामुळे देशासाठी काही तरी करायचे या भावनेतून त्यांनी रेजिमेंटमधील मित्रांना फोन करुन परिस्थिती सांगितली़ देवडे यांच्या अनेक मित्रांनी त्यासाठी आर्थिक हातभार लावला़ त्यानंतर देवडे यांनी त्या पैशातून अन्न-धान्य व इतर साहित्य खरेदी करुन झोपडपट्टी भागात वाटप करण्यास सुरुवात केली़
गरीबांच्या वस्तीत जावून धान्य, भाजीपाला, फळे, औषधी गेल्या सहा दिवसापासून देवडे हे वाटप करीत आहेत़ सैन्यदलात असलेल्या जिल्ह्यातील अनेक सैनिकांनी देवडे यांचे कौतुक करीत त्यांना आर्थिक पाठबळ दिले़ तसे पाहता देवडे हे अधिकची सुट्टी मिळाल्याने कुटुंबा समवेत घरी आनंदात राहू शकले असते़ परंतु देशसेवेची शपथ घेतलेले सैनिक संकटात कधीही मागे हटत नाहीत, हेच देवडे यांच्या कृतीतून दिसून आले़
ओळख नसलेल्यांनी ही केली मदतनांदेड जिल्ह्यातील सैनिकांचा नांदेड फौजी नावाचा व्हॉट्सअॅप गु्रप आहे़ या ग्रुपवर कल्पना मांडली़ त्यानंतर अनेक मित्रांनी पाचशे ते दोन हजार रुपयांची मदत पाठविली़ शाळेतील मित्रांनीही पाठबळ दिले़ ज्यांना मी ओळखत नाही, कधी भेटलोही नाही, अशा लोकांनीही पैसे पाठविले़ संकटाच्या काळात एकमेकांच्या मदतीसाठी धावून जाणारे लोक पाहून गहिवरुन आले असल्याचे देवडे यांनी सांगितले़