नांदेड : गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नांदेडकर सरसावल्यानंतर मंगळवारी महापालिका प्रशासनाने पर्यावरणतज्ज्ञ, पक्षितज्ज्ञ, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांची गोदावरी नदीघाटावरच पाहणी करुन गोदावरी नदी शुद्धीकरणाच्या उपाययोजनावर चर्चा केली.गोदावरी नदीत होणारे वाढते प्रदूषण शहरवासियांच्या भावना दुखावणारे ठरत आहे. सोमवारी सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी श्रमदान करुन गोदावरी नदी स्वच्छतेसाठी हातभार लावला. महापालिका प्रशासनही आठ दिवसांपासून मोठ्या यंत्रणेसह गोदावरीत उत्पन्न झालेली जलपर्णी वनस्पती काढण्यासाठी नदीत उतरले आहे. नागरिकांच्या गोदावरी नदीप्रति उमटलेल्या भावना लक्षात घेऊन प्रभारी आयुक्त काकडे यांनी मंगळवारी सकाळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणतज्ज्ञ, पक्षितज्ज्ञ यांच्याशी थेट गोदावरी नदीकाठी नगीनाघाट येथे चर्चा केली. यावेळी गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्राचार्य डी. यू. गवई, हर्षद शहा, सुधीर वडवळकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डॉ. व्यंकटेश काब्दे, उपायुक्त विलास भोसीकर, स. अजितपालसिंघ संधू, सहायक आयुक्त डॉ. मिर्झा बेग, रमेश चवरे, सहायक आयुक्त प्रकाश गच्चे, सुधीर इंगोले, गौतम जैन, राघवेंद्र कट्टी आदींची उपस्थिती होती. ४ मे रोजी महापालिकेत विस्तृत बैठक घेतली जाईल, असे काकडे म्हणाले.प्रस्तावित आराखड्यावरही चर्चा
- महापालिकेने गोदावरी स्वच्छतेसाठी राज्य शासनाला २२ कोटी रुपयांचा आराखडा पाठविला होता. आराखड्यात बदल सुचविण्याचे निर्देश दिले होते. जवळपास २८ ते ३० कोटी रुपयांचा नवीन आराखडा मनपाने तयार केला आहे़
- या आराखड्याबाबतही मंगळवारी गोदावरी घाटावर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावित आराखड्यावर चर्चा करताना सामाजिक कार्यकर्त्यानी काही सूचनाही केल्या. दरम्यान, याबाबत आता काय कार्यवाही होते याची उत्सुकता आहे़