नांदेड : कोल्हापूर संस्थानचे युवराज खा. छत्रपती संभाजीराजे यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची त्यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या दोन नेत्यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक घेण्यासह मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
खा. छत्रपती संभाजीराजे एक दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर आले होते. रविवारी सायंकाळी ४ वाजता त्यांचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी आगमन झाले. दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. विशेषत: मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण न्यायालयात सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा ऊहापोह करण्यात आला.
मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबईमध्ये बैठक घेण्यात येईल. हे आरक्षण टिकले पाहिजे़ मराठा समाजातील तरुणांना लाभ मिळाला पाहिजे. या दृष्टीने आपण सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे यावेळी चव्हाण यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याशी चर्चा करतांना सांगितले. त्यासोबतच छत्रपती शाहू महाराज व डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यातील स्नेहपूर्ण संबंधांना यावेळी उजाळा देण्यात आला़ यावेळी माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, माजी आ. हणमंतराव पा. बेटमोगरेकर आदींची उपस्थिती होती.