हदगाव (नांदेड): अल्लड वयातील प्रेमाला पूर्णत्वास नेण्यासाठी एका तरुणीने वयाचे १८ वर्ष पूर्ण होताच तब्बल ८०० किमीचा प्रवास करून थेट प्रियकराचे घर गाठले (As young lady completed 18 years, she reached her lover's house by traveling 800 km). ठाणे ते नांदेड जिल्ह्यातील मनाठा असा प्रवास तरुणीने केल्याची घटना रविवारी पुढे आली. दरम्यान, माग काढत पाठीमागे आलेल्या मुलीच्या पालकांनी पोलिसांना कारवाईची मागणी केली. मात्र, पोलिसांनी दोघेही सज्ञान असल्याचे सांगत समजूत काढली. अखेर मुलीच्या पालकांच्याशिवाय त्या तरुण-तरुणीचा विवाह पार पडला.
'ती' ठाण्यासारख्या मेट्रो सिटीतील तर 'तो' हदगाव तालुक्यातील मनाठा या खेड्यातील. पाचवर्षांपूर्वी ठाण्यात कामानिमित्त आल्यामुळे त्याची आणि तिची ओळख झाली. अल्लड वयात दोघांचेही प्रेम जुडले. मुलीच्या घरी याची भनक लागली. दोघांच्या जाती वेगळ्या असल्याने त्यांनी या नात्यास विरोध केला. यामुळे दोघेही हतबल झाले. शिवाय मुलगी बालिक असल्याने पळून जाऊन लग्नाचा मार्गही बंद होता. दरम्यान, काही कारणास्तव तरुण घरी परतला. मात्र, दोघेही मोबाईलवरून संपर्कात होते. तरुणाने घरी येताच सर्व जबाबदाऱ्या अंगावर घेतल्या. बहिणीचे लग्न लावून दिले, घर बांधले. इकडे वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्याने तरुणीने लग्नाचा आग्रह सुरु केला. दरम्यान, वडिलास अर्धांगवायूचा झटका आल्याने तरुण थोडा विचलित झाला. मात्र, लग्नावर ठाम असलेल्या मुलीने १८ नोव्हेंबरला ठाणे स्टेशन गाठून थेट नांदेड गाठले. येथून तालुक्यातील मनाठा गावी ती आली.
पोलिसांची साथ, बंधने झुगारून आले एकत्र मुलगी घरातून निघून गेल्याने पालकांनी ठाणे येथील पोलीसात तक्रार दिली. तपासात मोबाईल लोकेशन मनाठा दाखवत असल्याने पालकांनी मुली पाठोपाठ मनाठा गाठले. स्थानिक पोलिसांनी मुलीच्या पालकांनी घटनेची माहिती दिली. यावरून सपोनि विनोद चव्हाण यांनी दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले. यावेळी दोघांनीही वयाची पुरावे सादर केली. दोघेही सज्ञान असल्याने पोलिसांनी कारवाईची मागणी करणाऱ्या मुलीची पालकाची समजूत काढली. पोलिसांनी सहकार्याचा सल्ला दिल्याने मुलीने परजातीचा मुलगा निवडला, खेड्यातील मुलासाठी घर सोडले, असा त्रागा करत पालकांनी तेथून काढता पाय घेतला. अखेर जातीपातीच्या,गरीब-श्रीमंत, शहर-खेडे अशा अनेक जुन्या विचारांच्या भिंती तोडून ते दोघे विवाह बंधनात अडकले.