धर्माबाद : येथील दुकानदारावर पाळत ठेवून, वाईन शॉप मालकाच्या आईला चाकूचा धाक दाखवून घरातील पाच लाखांची बॅग पळविणारा चोरटा दहा दिवसांनंतर १५ सप्टेंबर रोजी पोलिसांना सापडला आहे. हा चोरटा याच वाईन शॉप दुकानावरील अल्पवयीन कामगार आहे.
धर्माबाद शहरातील व्यापारी व्यंकटेश गौड काशा गौड यांचे एलोरा वाईन शॉप नावाचे दुकान आहे. दिवसभर झालेल्या गल्ल्यातील रुपये हे बॅगमध्ये भरून घरी आणले असता ८ सप्टेंबर रोजी रात्री घरात मालकाच्या आईला चाकूचा धाक दाखवून अज्ञात चोराने पाच लाखांची बॅग पळवली होती.
दि. ९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनानंतर डीवायएस विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांनी तपास चक्र फिरविले. प्रथम एलोरा वाईन शाॅप व घराच्या आजूबाजूचे सीसी टीव्ही कॅमेरे तपासले. त्यानंतर संबंधित पंधरा ते वीस जणांची चौकशी सुरू होताच, भीतीने चौथ्या दिवशी गौड यांच्या घरात १२ रोजी सकाळी एक लाख ९७ हजार ८०० रुपये व एक चिठ्ठी फेकून चोरटा पसार झाला. चिठ्ठीमध्ये तेलगू भाषेत ‘माफ करा, चोरी करायची नव्हती; पण केली... पोलिसांना सांगा, माफ करा...’ असे लिहिले होते.
यामुळे जवळचाच कोणीतरी असावा, असा संशय वाढल्याने तपास करणे पोलिसांना सोयीचे झाले. दोन-तीन जणांवर संशय वाढल्याने त्यांच्यावर पाळत ठेवून, त्यांच्या वर्तनात बदल झाल्याचे दिसताच त्यांना ताब्यात ठेवून खाकी वर्दीचा खाक्या दाखवताच अल्पवयीन चोराने कबुली दिली. १६ सप्टेंबर रोजी दोन लाख ९१ हजार रुपये रक्कमदेखील त्याच्याकडून वसूल करण्यात आली. सहायक पोलीस उपनिरीक्षक मसलेकर, आदींनी सहकार्य केले.