५ डिसेंबर रोजी कंधार तालुक्यातील हरबळ (प.क.) येथे कृषी विभाग कंधारच्या वतीने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जागतिक मृदानानिमित्त जमीन आरोग्य पत्रिका प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या सिंधू टाले ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अरविंद पांडागळे, रमेश देशमुख (तालुका कृषी अधिकारी, कंधार), विकास नारनाळीकर (मंडळ कृषी अधिकारी, पेठवडज), कृषी सहायक जीवन कळणे, संजय माळी, एस. व्ही. गुट्टे, सतीश वाघमारे, एन. बी. कुंभारे, शिवाजी पाटील गिरे, संजीवकुमार तेलंग, प्रदीप केंद्रे, अशोक केंद्रे, संतोष गिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना प्रा. पांडागळे म्हणाले, जमिनीचे आरोग्य हे जमिनीची सुपीकता आणि जमिनीची उत्पादन क्षमता, जमिनीत असणारे घटक व जमिनीचे गुणधर्म यावर अवलंबून असते. जमिनीमध्ये असणारी खनिजद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ, जल त्यासाठी रासायनिक खतांऐवजी जैविक, नत्र व सेंद्रिय खते वापरून विषमुक्त शेती करण्याचे आवाहन केले.
तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख व सिंधू टाले यांनी गटशेतीविषयी मार्गदर्शन केले. कृषी सहायक संभाजी वडजे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. बालाजी कागणे यांनी सूत्रसंचालन केले, तर संजीवकुमार तेलंग यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी हरबळ, गऊळ, घागरदरा, भोजूवाडी या गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बांबू लागवड प्रक्रियेसाठी मार्गदर्शन
निवघा बाजार : शेतकऱ्यांना शेतीमध्ये फायदेशीर ठरत असलेल्या बांबू या पिकाची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पर्यावरणाचे अभ्यासक तथा माजी आमदार पाशा पटेल यांच्या उपस्थितीत मंगळवारी ९ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता कोहळी, ता. हदगाव येथे मार्गदर्शन आयोजित केले असून, हदगाव हिमायतनगर तालुक्यासह निवघाबाजार परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आयोजक शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबूराव कदम कोहळीकर यांनी केले आहे.