दुसरीकडे गेल्या काही दिवसात अत्यवस्थ रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या रेमडेसिवर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. एका रुग्णाला पाच ते सहा डोस देण्यात येतात. एकवेळेस डोस सुरु केल्यानंतर त्यामध्ये खंड पडू देता येत नाही. परंतु इंजेक्शन वेळेवर मिळत नसल्याने रुग्ण आणि नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. रुग्णालयांनी १०० व्हायल मागविल्यानंतर त्यांना ३० ते ४० व्हायल मिळत आहेत. त्यामुळे रुग्णालयाकडून नातेवाईकांनाच इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यास सांगण्यात येत आहे. त्यानंतर नातेवाईक इंजेक्शनसाठी दारोदार फिरत आहेत. याचा फायदा संधीसाधू घेत असून, १४०० रुपयांचे इंजेक्शन तब्बल चार हजार रुपयांना विक्री करण्यात येत आहे. अशा प्रकारे खुलेआम लूट होत आहे. खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनही वेळेत आणि मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने त्यांचीही अडचण झाली आहे.
अडीच हजार व्हायल मिळाले
मार्च एण्ड असल्यामुळे इंजेक्शन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे बिलिंग करणे सुरु होते. त्यामुळे शनिवारी रात्री त्यांनी ट्रान्सपोर्टमध्ये व्हायल टाकले. ते पहाटेच्या सुमारास आपल्याला मिळाले. आलेले अडीच हजार इंजेक्शन वाटपही करण्यात आले आहे. रेमडेसिवर हे अहमदाबाद, हैद्राबाद येथील कंपन्या तयार करतात. परंतु कच्चा मालाच्या तुटवड्यामुळे त्यांचे उत्पादन कमी झाले आहे. नांदेडात यापूर्वी विक्रेत्यांशी बोलून इंजेक्शनसाठी १४०० रुपये आकारण्याचे ठरविले होते. परंतु आता सिपला या कंपनीनेच मूळ किंमत १४५० रुपये केली आहे. त्यामुळे इंजेक्शनसाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागतील. इतर राज्यातूनही इंजेक्शन मागविण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु त्याची किंमत दोन हजार आणि सोबत जीएसटी अशी आहे. त्यामुळे तेही महागडे ठरणार आहे. इंजेक्शनचा तुटवडा होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
डॉ. माधव निमसे, अन्न व औषध प्रशासन