चौकट
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी जिल्ह्यासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसूचना लागू केली आहे. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीमध्ये प्रतिकूल परिस्थिती उदा. पूर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.
नांदेड जिल्ह्यात समितीच्या अहवालानुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना लागू केली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, खरीप ज्वारी या पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच पात्र विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम अदा करण्याबाबतचे निर्देशही विमा कंपनीस दिले आहेत.