- गोविंद टेकाळे/ युनूस नदाफ अर्धापूर/पार्डी (जि़नांदेड) : पंधरा दिवसांअगोदर पिकाची अवस्था शेतकऱ्यांना दिलासा देणारी होती. दृष्ट लागावी, असे पीक होते़; परंतु परतीच्या पावसाने हजेरी लावून पिकांचे वाटोळे केले. पंधरा दिवसांअगोदर काय होते? आता काय होऊन बसले अशी दशा आहे. सोयाबीन, कापूस, फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हळदीवर बुरशीसह अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला़ शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकापासून फार मोठी आशा होती़ पिकेही जोमात होती़ खरीप हंगामातील पिकांपासून चार पैसे पदरात पडतील, या पैशातून डोक्यावरील कर्ज कमी होईल, याच पैशातून रबी हंगामातील पिकांसाठी बी- बियाणे खरेदी करता येईल, अशी आशा बाळगून शेतकरी खरिपाची कापणी करीत होता़ परंतु परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले़ आता कोणत्या पिकाच्या सा'ाने जगावे, हा मोठा प्रश्न बळीराजासमोर आहे.
अर्धापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे सोयाबीन कापूस, उडीद, मूग व ज्वारी २६००१ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील़ तालुका कृषी विभागाने सादर केलेल्या नुकसानाच्या प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यात ५६ गावे व एकूण २८००० शेतकरी आहेत. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र २८२७० हेक्टर आहे. त्यापैकी २६००० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. आतापर्यंत १३५०० शेतकऱ्यांचे अर्ज जमा झाले आहेत .
पीकनिहाय एकूण क्षेत्र व बाधित क्षेत्र सोयाबीन - १७४६३ बाधित १५८४३, कापूस १६७३ बाधित १५०५ व इतर ८० बाधित ८०