नांदेड : केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारी मुक्तीची विशेष मोहीम राबविण्यात येत असून शहरातील हागणदारीमुक्त ठिकाणांना भेटी देण्यासाठी गुड मॉर्निंग पथकाची स्थापनाही केली आहे़क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियंत्रण अधिकारी, क्षेत्रीय पथक (त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांसमवेत) तसेच हागणदारीच्या ठिकाणी दत्तक अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. ६ जानेवारीपासून स्थापन करण्यात आलेल्या या गुड मॉर्निंग पथकाला पहाटे ५.३० ते ८ वाजेपर्यंत काम लागणार आहे. दत्तक अधिका-यांनीही आपल्या अधिनस्थ कर्मचा-यांना सदर मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेचे समन्वय अधिकारी म्हणून मुख्य लेखाधिकारी व उपायुक्त प्रशासन हे राहणार आहेत. गुड मॉर्निंग पथकाच्या कार्यात दिरंगाई आढळल्यास संबंधिताविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तरोडा-सांगवी या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तरोडा खु., रेल्वे डिव्हिजन, त्रिरत्ननगर, अरुणोदयनगर, दीपकनगर, दिलराजनगर, शिवरायनगर, नालंदानगर, विमानतळ रस्ता, विजयनगर, अंबानगर या भागात शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे तर अशोकनगर झोनमध्ये कार्यकारी अभियंता गिरीष कदम हे जबाबदारी पार पाडत आहे. माळटेकडी, सखोजीनगर, गोविंदनगर, हमालपुरा, गोकुळनगर या भागांचा समावेश आहे. शिवाजीनगर झोनअंतर्गत लालवाडी, श्रावस्तीनगर, सावित्रीबाई फुलेनगर, राजनगर, भीमसंदेश कॉलनी या भागाची जबाबदारी कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांच्याकडे सोपवली आहे. क्षेत्रीय कार्यालय वजिराबादअंतर्गत विलास भोसीकर हे काम पाहत असून गोवर्धनघाट, खडकपुरा, उस्मानशाही मिल परिसर, पक्कीचाळ ते पोलीस चौकी या भागात गुड मॉर्निंग पथक काम पाहणार आहे. इतवारा झोनमध्ये लक्ष्मीनगर, महेबुबनगर, विठ्ठलनगर, पंचशीलनगर, शिवनगर, शांतीनगर आदी भागांवर शहर अभियंता माधव बाशेट्टी नजर ठेवून आहेत.
- सिडको झोनअंतर्गत म्हाडा कॉलनी, रहीमपूर, असर्जन कँप, भीमवाडी, राहुलनगर, वाघाळा, असदवन, शाहूनगर, वसरणी, जुना कौठा, सिडको स्मशानभूमी परिसर आदी भागांची जबाबदारी प्रकाश येवले यांच्यावर सोपविली आहे.
- मूळ सहायक आयुक्तांना डावलले
- महापालिकेने स्थापन केलेल्या गुड मॉर्निंग पथकात नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त केलेले उपायुक्त प्रकाश येवले आणि विलास भोसीकर हे सध्या प्रशिक्षण दौ-यावर आहेत. ते येईपर्यंत येवले यांच्या ठिकाणी प्रकल्प संचालक अशोक सूर्यवंशी तर भोसीकर यांच्या ठिकाणी उपअभियंता विश्वनाथ स्वामी यांना पदभार दिला आहे. या पथकाची जबाबदारी देतानाही मूळ सहायक आयुक्तांना डावलल्याची प्रतिक्रिया पुढे आली आहे.