नांदेड : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून खटाटोप सुरु असून आता तळाला गेलेल्या विष्णूपुरी प्रकल्पातून पाणी पंपगृहापर्यंत आणण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत. आणखी पाच ते सहा दिवसांनंतर महापालिकेला सात वर्षानंतर मृतसाठा उचलण्याची वेळ येणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. महापौर दीक्षा धबाले यांनीही पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधले असून सोमवारी बैठकीत आढावा घेतला. ईदनिमित्त दोन दिवस मुस्लिमबहुल भागात पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.विष्णूपुरी प्रकल्पातून झालेल्या अवैध पाणी उपशावर वेळीच निर्बंध न घातल्याने शहराला आता पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. विशेषत: दक्षिण नांदेड तहानलेले आहे. १ जूनपासून महापालिकेने चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच पाण्यासाठी नांदेडकरांना चार दिवस वाट पहावी लागत आहे.महापौरपद स्वीकारल्यानंतर दीक्षा धबाले यांनी सोमवारी पाणीपुरवठा विभागाची पहिली बैठक घेतली. यात धबाले यांनी उपलब्ध पाणी किती आणि हे पाणी किती दिवस पुरेल याचा आढावा घेतला. त्यात आता दोन दिवसांवर मुस्लिम बांधवांची ईद आली आहे. या सणासाठी मुस्लिमबहुल भागात पाणीपुरवठा योग्य प्रमाणात व्हावा याकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. आढावा बैठकीस सभापती फारुख अली खान, आयुक्त लहुराज माळी, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, नगरसेवक उमेश चव्हाण, दीपक पाटील, किशन कल्याणकर, रमेश गोडबोले, सदाशिव पुरी, फारुख बदवेल, विजय येवनकर, राजू येन्नम, उपअभियंता संघरत्न सोनसळे आदींची उपस्थिती होती.या बैठकीनंतर महापौर दीक्षा धबाले यांनी आयुक्तांसह विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील पंपगृहास भेट दिली. विष्णूपुरी प्रकल्प तळाला गेल्याने पंपगृहापर्यंत पाणी आणण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत. या चरातून पाणी पंपगृहापर्यंत सध्या पोहोचत आहे.प्रकल्पातील जिवंत जलसाठ्यातून चार ते पाच दिवस पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. त्यानंतर मृत जलसाठा उचलण्याची वेळ महापालिकेवर येणार आहे. हा मृतजलसाठा उचलण्यासाठी यंत्र सामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. कोटीतीर्थ पंपगृहात आणि काळेश्वर येथील पंपगगृहात सध्या जिवंत जलसाठ्यातील पाणी उचलले जात आहे. त्यानंतर मृत जलसाठा घेतला जाणार आहे. हा मृत जलसाठा नेमका किती आहे? याबाबत स्पष्टपणे सांगायला कोणीही धजावत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मृत जलसाठ्यातून किती दिवस तहान भागेल हाही प्रश्न आहे. या पाहणीदरम्यान, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उमेश पवळे, राजू काळे, किशोर स्वामी, आनंद चव्हाण आदींची उपस्थिती होती.सात वर्षांनंतर मृत जलसाठा उचलणारशहराला पाणीपुरवठा करण्यासाठी विष्णूपुरी प्रकल्पातून २०१३ मध्ये मृत जलसाठा उचलण्यात आला होता. त्यानंतर २०१९ मध्ये हा मृत जलसाठा उचलण्याची वेळ मनपावर आली आहे. मृत जलसाठा उचलण्यासाठी १० विद्युतपंप तयार ठेवले आहेत. जिवंत जलसाठा संपताच मृत जलसाठा घेतला जाणार आहे.
नांदेडमध्ये पाण्यासाठी खटाटोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:28 AM