श्रीनिवास भोसले नांदेड : अखंड भारताची संकल्पना घेऊन भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा आज, गुरुवारी नांदेड शहरात दाखल होत आहेत. महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा ते नांदेडात घेणार असून, त्यांच्या सभेची उत्सुकता ताणली गेली आहे.
कन्याकुमारी येथून निघालेली ही यात्रा ६० दिवसांचा प्रवास करून ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून महाराष्ट्रात दाखल झाली. देगलूर तालुक्यातील वेन्नाळी, आटकळी, बिलोली तालुक्यांतील खतगाव फाटा, भोपाळामार्गे ही यात्रा बुधवारी नायगाव तालुक्यातील शंकरनगर येथे पोहोचली आहे. शंकरनगर, नायगाव आणि कृष्णूरपर्यंतचा प्रवास करून ही यात्रा गुरुवारी दुपारी तीन वाजता नांदेड शहरातील देगलूर नाका येथे पोहोचणार आहे. तेथून पदयात्रा काढण्यात येईल. सायंकाळी साडेपाच वाजता शहरातील नवा मोंढा येथे राहुल गांधी राज्यातील पहिली जाहीर सभा घेणार आहेत.
राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांचीही उपस्थिती काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे नांदेड येथील सभेला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांची टीमच नांदेड शहरात दाखल होणार आहे.
पवार, ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आदी नेतेमंडळी सभेसाठी येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. आदित्य ठाकरे हे ११ नोव्हेंबर रोजी पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्याच्या राजकारणावर काय बोलणार? महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. शिवसेनेतील बंडाळीनंतर हे सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे गट-भाजपचे सरकार स्थापन झाले. यावर राहुल गांधी काय बोलतात याची उत्सुकता आहे. देशातील महागाई, बेरोजगारी, शिक्षणाच्या प्रश्नावरही त्यांची भूमिका गुरुवारी जाहीर सभेतून पुढे येणार आहे.
...यांनी घेतला पदयात्रेत सहभाग- भारत जोडो पदयात्रेत आतापर्यंत समविचारी राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार, योगेंद्र यादव, पत्रकार निखिल वागळे, आदींचा समावेश आहे. - योगेंद्र यादव हे कन्याकुमारीपासून यात्रेत सहभागी झाले असून, काश्मीरपर्यंत चालणार आहेत. नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर या बुधवारी पदयात्रेत दाखल होणार होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला.ही चुनाव जितो यात्रा नाही : जयराम रमेशकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढलेली ‘भारत जोडो’ यात्रा ही विधानसभा किंवा लोकसभा निवडणुका समोर ठेवून काढली नसून, सामान्यांच्या प्रश्नांसाठीची ही यात्रा आहे, असे माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी बुधवारी येथे सांगितले. यात्रा बुधवारी नायगाव येथे पोहोचल्यानंतर रमेश यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, निवडणुकीत या यात्रेचे काय परिणाम होतील, याचा आम्ही विचार करीत नाही. तो येणारा काळ ठरवील; परंतु एवढे मात्र नक्की की, या यात्रेमुळे भाजप घाबरली आहे; त्यामुळेच दररोज टी शर्ट घातले, काय जेवण केले, यावरून टीका करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला; कारण पहिल्यांदाच काँग्रेस एवढ्या आक्रमकपणे राजकीय अजेंडा घेऊन रस्त्यावर उतरली आहे.