नांदेड: बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात २0 हजार घरकुलांचे उद्दिष्ट गाठण्यात येत असले तरी लाभार्थ्यांच्या असहकारामुळे लोकवाटा वसुलीत मनपाला अपयश आले आहे. एकूण ७९ कोटी ८५ लाख रूपयांपैकी आतापर्यंत फक्त १२ कोटीच लोकवाटा वसूल करण्यात आला आहे.
बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात १४ हजार घरकुले बांधून पूर्ण झाले असून २ हजार ८00 घरांचे कामे प्रगतीपथावर आहेत. २0 हजार घरे बांधण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मनपाने नवीन भागातही घरकुलांचे कामे सुरू केले आहेत. ही योजना मार्च २0१५ मध्ये संपत आहे.
दरम्यान, लाभार्थ्यांचा वाटा मात्र मनपाच्या तिजोरीत जमा होताना दिसत नाही. एकूण ७९ कोटी ८५ लाख रूपये लोकवाट्याचे वसूल होणे गरजेचे आहे. मात्र मागील तीन, चार वर्षांत केवळ १२ कोटीच जमा झाले आहेत.
प्रारंभी अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना २३ हजार ५00 तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना २८ हजार २00 रूपये लोकवाटा भरावा लागला. मात्र त्यानंतर मंजूर झालेल्या घरकुलांची किंमत वाढल्याने लोकवाट्यातही वाढ झाली.
तरोडा भागातील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना २८ हजार २00 तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ३४ हजार ५00 रूपये लोकवाटा होता. तर तिसर्या टप्यात सुरू झालेल्या ब्रह्मपुरी भागातील घरकुलांसाठी पुन्हा लोकवाट्यात वाढ झाली. याठिकाणी अनुसूचित जातीसाठी ३४ हजार ५00 तर सर्वसाधारण लाभार्थ्यांना ४१ हजार ४00 रूपये लोकवाटा होता.
मात्र लाभार्थ्यांकडून वसुलीला प्रतिसाद मिळत नसल्याने अपेक्षित लोकवाटा मिळू शकला नाही. हा निधी मनपाच्या तिजोरीत न आल्यामुळे संबंधित भागाच्या मूलभूत सुविधांच्या देखरेखीचे कामेही थंडावले आहेत.
मनपाकडून लोकवाटा वसुलीसाठी पथके तयार केली असून दररोज २0 ते २५ हजार रूपये वसुलीचे प्रमाण आहे. त्यामुळे एकूण लोकवाट्याचे उद्दिष्ट गाठण्याचा पल्ला बराच दूर आहे. (प्रतिनिधी)
लाभार्थ्यांनी लोकवाटा भरावा
■ शहरात बीएसयुपी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या १४ हजार घरकुलात लाभार्थी राहण्यास गेले आहेत. मात्र बहुतांशी लाभार्थ्यांनी महापालिकेकडे लोकवाटा भरला नाही. यासंदर्भात वेळोवेळी मनपाचे कर्मचारी लोकवाटा वसुलीसाठी फिरत आहेत. मात्र लाभार्थी त्यांना प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव येत आहे. आतापर्यंत ३0 कोटी वसूल होणे अपेक्षित होते. केवळ १२ कोटीच मनपाच्या तिजोरीत जमा आहेत. असून ज्या लाभार्थ्यांकडे लोकवाटा बाकी आहे, अशांनी तातडीने लोकवाटा मनपाकडे जमा करावा, असे आवाहन आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी केले आहे.