नांदेड : इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आला़ नांदेड जिल्ह्याचा ८९.५३ टक्के निकाल लागला असून मागील वर्षीच्या निकालाच्या तुलनेत तो २१.४० टक्क्यांनी उंचावला आहे़ गतवर्षी दहावीचा निकाल ६८.१३ टक्के इतका लागला होता. याही वर्षी मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे़. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.४८ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.९९ टक्के इतके आहे़
यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील ४६ हजार २२२ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी अर्ज भरले होते़ त्यापैकी ४५ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली़ यंदा ८९.५३ टक्के निकाल लागला असून जिल्ह्यातील १० हजार ८३८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत़ तर १३ हजार १२८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि १२ हजार २६२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत़ जिल्ह्यातील एकूण ४० हजार ९०३ विद्यार्थी या परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत़
तालुकानिहाय निकालाचा विचार करता नांदेड तालुका ९१.९५ टक्के, अर्धापूर ९०.७५, भोकर ८८.५१, उमरी ९१.०३, नायगाव ९१.३८, मुदखेड ८४.५०, मुखेड ९२.९१, माहूर ८६.५६, लोहा ८८.३१, किनवट ८८.१०, कंधार ८४.५३, हिमायतनगर ८४.८३, हदगाव ८६.२२, धर्माबाद ९१, देगलूर ८९.१७ तर बिलोली तालुक्याचा निकाल ९३.१६ टक्के लागला आहे़