नांदेड- महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरु आंदोलनात (ST Strike ) सामील असलेल्या नांदेडमधील एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. दिलीप वीर असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला (ST employee dies while undergoing treatment in Nanded). दरम्यान, निलंबनाची कारवाई होणार म्हणून वडील सतत तणावात होते, त्यांचा बळी या सरकारनेच घेतला, असे म्हणत मृत वीर यांच्या मुलाने टाहो फोडला.
नांदेडच्या मध्यवर्ती आगारात सुरू असलेल्या आंदोलनात एसटी कर्मचारी दिलीप वीर हे सामील होते. काल दुपारी अचानक ते बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी केल्यानंतर उच्च रक्तदाबामुळे त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे स्पष्ट झाले. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचारा सुरु होते. दरम्यान, आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वीर यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कर्मचारी संतापले आहेत. यामुळे नांदेडमधील आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
५० लाखांची मदत द्यावी दरम्यान, संपात सहभागी असताना वडील सतत बैचैन होते. आज न उद्या न्याय मिळेल असे आम्ही त्यांना सतत सांगत. मात्र, ते झोपेतून मध्येच उठत, संपाचे व्हिडीओ पाहत. सरकार निलंबनाची कारवाई करत आहे. यामुळे ते अधिक तणावात होते. त्यांचा बळी राज्य सरकारनेच घेतला, असा आरोप मृत कर्मचारी वीर यांच्या मुलाने केला आहे. तसेच शासनाने मागणी मान्य केली नाही. यामुळे आंदोलनात सहभागी दिलीप वीर यांचा मानसिक तणावातून मृत्यू झाल्याचा आरोप एसटी संघटनांनी केला आहे. तसेच कर्मचारी दिलीप वीर यांच्या कुटुंबियांना शासनाने तातडीने ५० लाखांची मदत द्यावी अशी मागणी आंदोलक एसटी कर्मचारी संघटनांनी केली आहे.