नांदेड : शहरातील वजिराबाद भागात एका युवकाला चाकूचा धाक दाखवित दुचाकीवरुन आलेल्या सहा जणांनी लुबाडले होते़ या प्रकरणात पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पॉकेटमनीसाठी ते चो-या करीत असल्याचे उघडकीस आले आहे़२७ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास राधेगोविंद रुग्णालयासमोर आनंदा विठ्ठलराव सावरकर हे रिक्षाची वाट पाहत असताना दुचाकीवरुन आलेल्या सहा जणांनी त्यांना अडविले़ सावरकर यांना चाकूचा धाक दाखवित त्यांच्याकडून रोख २२०० रुपये, एटीएम, आधार कार्ड काढून घेतले होते़ याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ या प्रकरणात वजिराबाद व स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु होता़ १ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला खब-याकडून माहिती मिळाली़ त्यानुसार हा गुन्हा शिवप्रसाद ऊर्फ सॅन्डी बोडके रा़बायपास रोड याने इतर साथीदारांच्या मदतीने केला असल्याच्या खबरीवरुन पोनि़सुनील निकाळजे यांनी पथकाला सूचना दिल्या़ सपोनि पांडुरंग भारती यांनी पथकासह शोध घेतला़ त्यात शिवप्रसाद ऊर्फ सॅन्डी लक्ष्मण बोडके, राणा भगवानसिंग ठाकूर रा़ब-यामसिंग नगर, गौरव दीपक येलमेवाड रा़ब-यामसिंगनगर, अनिल सुरेश पवार राग़ोविंदनगर, आकाश उमाकांत ठाकरे रा़आनंदनगर व गणेश गंगाधर शिंदे रा़लोणी खु़ता़अर्धापूर या सहा जणांना ताब्यात घेतले़ आरोपींना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली़ तसेच शहरातील आनंदनगर, बाबानगर, व्हीआयपी रोड, डीमार्ट, मालेगाव रोड, शिवमंदिर रोड भागात चाकूचा धाक दाखवून अनेकांना लुबाडल्याची कबुली दिली़ या पथकात पोउपनि के़ बी़ नेहरकर, सपोउपनि जसवंतसिंह शाहू, एएसआय रमेश खाडे, पोहेकॉ़ कुलकर्णी, पांगरेकर, शेख जावेद आदींचा समावेश होता़
- स्थानिक गुन्हे शाखेने यातील राणा ठाकूर यास यापूर्वीही अटक केली होती़ त्यावेळी त्याने नऊ मंदिरात चोरी केल्याचे तसेच एक दुचाकी लंपास केल्याची कबुली दिली होती़ पॉकेटमनीसाठी गुन्हे करीत असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले़या सर्व आरोपींना वजिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़