खुरगाव येथे रक्तदान शिबिर
नांदेड - खुरगाव येथे श्रामनेर प्रशिक्षण केंद्रात भिक्खू संघाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २६ जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाला डॉ. सुषमा पांगरकर, डॉ. सवा नवशीन, एस. डी. नागरगोजे, बालासाहेब भालेराव, लक्ष्मण येळणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी भंते संघरत्न, चंद्रमनी नेतानंत, धम्मकीर्ती, सुदर्शन आदी उपस्थित होते.
गळफास लावून आत्महत्या
मुखेड - मुखेड शहरातील शिवाजीनगर येथे पद्माकर मीरदोडे (वय ३४) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण कळाले नाही. त्यांचा भाऊ कैलास मीरदोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. जमादार वाघमारे तपास करीत आहेत.
बरबडा-कहाळा रस्त्याची दुरवस्था
नायगाव - तालुक्यातील बरबडा, पाटोदा, कहाळा या रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्याने प्रवास करणे कठीण बनले आहे. अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. खासदार प्रताप पाटील चिखलीकर व आमदार राजेश पवार यांनी निवडणुकीपूर्वी बरबडा परिसरातील रस्ते चकचकीत करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता कधी होईल, असा सवाल नागरिक करीत आहेत.
पूल वाहून गेला
लोहा - तालुक्यातील चितळी, हिप्परगा, तेंडू या गावांना जाणारा चितळीलगतचा पूल पावसाने वाहून गेला. ही घटना रविवारी घडली. या रस्त्यावरील मजबुतीकरणाचे काम आठ महिन्यांपासून सुरू आहे. केवळ मुरूम, गिट्टी टाकून रस्त्याची दबाई केली जाते. हळदवलगतच्या शेताजवळ दोन्ही बाजूला सिमेंटचा नाला बांधकाम प्रलंबित आहे. अशातच रविवारी आलेल्या पावसाने पूल वाहून गेला.
अपघातात दोघे जखमी
बिलोली - देगलूर-बिलाेली रोडवरील मुतन्याळ गावाजवळ सोमवारी सायंकाळी दोन दुचाकी एकमेकावर आदळल्या. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले, तर एक किरकोळ जखमी झाला. दुचाकीवरून शंकर पेंटे हे बिलोलीहून आदमपूरकडे, तर देगलूरहून दुसरी मोटारसायकल येत असताना ही घटना घडली. जखमींना बिलोली उपजिल्हा रुग्णालयातून नांदेडला हलविण्यात आले.
विजेचा सतत लपंडाव
किनवट - सारखणी परिसरात विजेची गळती तसेच लपंडावाला नागरिक वैतागले आहेत. येथील अभियंता अप-डाऊन करीत असल्याने कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने हा प्रकार घडत असल्याचा आरोप आहे. पाऊस, वारे असो अथवा नसो, विद्युत पुरवठा खंडित होणार हे ठरलेले असते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित दुर्लक्ष करीत आहेत.
विहीर कोसळून नुकसान
किनवट - तालुक्यातील उमरी बाजार परिसरातील पाथरी शिवारात मोठा पाऊस पडला. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्याची विहीर कोसळून मोठे नुकसान झाले. विद्युत मोटार व सोबतचे साहित्य मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडले. यामध्ये त्यांचे पीकही खरडून गेले. याला आठ दिवस झाले, मात्र साधा पंचनामाही केला नाही.
शहराध्यक्षपदी कांबळे
बिलोली - कुंडलवाडी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अमरनाथ कांबळे यांची निवड झाली. त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा चिटणीस गौसोद्दीन कुरेशी, जिल्हा चिटणीस रवी शेट्टी, तालुकाध्यक्ष नागनाथ सावळीकर, माजी जि. प. सदस्य सुभाष गायकवाड, संग्राम हायगले, युवक तालुकाध्यक्ष रणजित पाटील, गंगाधर प्रचंड, व्यंकट पांडवे, नागनाथ पाटील, नरसिंग जिठ्ठावार आदी उपस्थित होते.
विद्युत कर्मचारी संघटनेत प्रवेश
हिमायतनगर - तालुक्यातील विद्युत कर्मचारी सेनेच्या अनेकांनी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेत प्रवेश घेतला. हिमायतनगर उपविभागातील बैठक केंद्रीय उपाध्यक्ष सिद्धार्थ पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी विनायक ढवळे, शंकर घुले, नितीन रणवीर, सिद्धार्थ पिंपरे, राजू मेरगेवाड, अविनाश खंदारे, राम मोगळी आदी उपस्थित होते.
जांब शिवारात पाऊस
जांब - १२ जुलैपासून जांब शिवारात मुसळधार पाऊस पडत आहे. वर्ताळा, सांगवी बेनक, होंडाळा, सावरगाव, कामजळगा, मंग्याळ, लादगा, जांब खु. सावरगाव वाडी आदी परिसरात जोरात पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. शेतात पाणी साचल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान हाेत आहे. शेतीची कामे खाेळंबली आहेत.
साठे जयंती कार्यकारिणी
लोहा - साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीची कार्यकारिणी एका बैठकीत निवडण्यात आली. कार्यकारिणी अशी- अध्यक्ष- मिलिंद वाघमारे, उपाध्यक्ष- गोपाळ लोंढे, सचिव- गणेश दाढेल, कोषाध्यक्ष- भारत दाढेल, कार्याध्यक्ष- चांदू पाटोळे, सदस्य- श्रीधर दाढेल, चंद्रकांत धोंडगे, संदीप सावळे, नरसिंग भालेराव, श्रावन लोंढे, संजय दाढेल.
भूमिपूजन व लोकार्पण
नायगाव - तालुक्यातील मांजरम विभागातील विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा जि. प. सदस्या पूनम पवार यांच्याहस्ते पार पडला. सोमठाणा, गोदमगाव, गडगा, मोकासदरा, मांजरम आदी ठिकाणी हे कार्यक्रम झाले. यावेळी भगवानराव लंगडापुरे, सुभाष पवार, शरद माहेगावकर, साईनाथ सुगावे, शंकर कदम, संजय गुजरवाड, चंद्रकांत तमलुरे, श्रीकांत शिंदे, पिराजी देशमुख आदी उपस्थित होते.
‘प्रहार’तर्फे आर्थिक मदत
लोहा - लोहा तहसील येथे भीमराव शीरसाठ यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३ जुलै रोजी घडली होती. दरम्यान, प्रहार दिव्यांग संघटनेच्यावतीने शीरसाठ कुटुंबीयाला मदत देण्यात आली. यावेळी जिल्हा प्रमुख विठ्ठलराव मंगनाळे, राजू इबितदार, अनिल पाटील, गोविंद लोणे, बालासाहेब जोमेगावकर, मोहनराव शीरसाठ, सचिन शीरसाठ, नागोराव शीरसाठ, संतोष जाधव, पंजाब शीरसाठ, श्रीनिवास शीरसाठ आदी उपस्थित होते.
पोलीस चौकी बंद अवस्थेत
नांदेड - शहरातील विविध भागातील पोलीस चौक्या बंद अवस्थेत आहेत. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. चोऱ्या, घरफोड्या, चेन पळविणे, मोबाईल लंपास करणे आदी घटना वाढल्याने पोलीस चौक्या सुरू करणे आवश्यक बनले आहे. पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.