नांदेड : जवळपास २० दिवसाहून अधिक काळ उघडीप दिलेल्या पावसाने ऑगस्टच्या अखेरला मात्र जोरदार बॅटिंग केली. सलग पाऊस सुरु होता. परंतु त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाने खंड दिला आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. सकाळी थंडी जाणवत आहे तर दुपारी अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. अशावेळी वातावरणातील बदलामुळे साथीचे रोग मोठ्या प्रमाणात बळावतात. त्यामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे.
नांदेड शहरात सध्या डेंग्यूने थैमान घातले आहे. शहरातील सर्वच बाल रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्याचबरोबर न्यूमोनियाच्या आजाराचे रुग्णही वाढले आहेत. तसेच इतरही आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून नागरिकांनी तब्येत जपावी असे आवाहन केले आहे.
डेंग्यूने रुग्णालये हाऊसफुल्ल
सध्या लहान बालकांमध्ये डेंग्यूची साथ जोरात पसरत आहे. त्याचबरोबर न्यूमाेनियानेही डोके वर काढले आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार बळावतात. त्यामुळे सध्या रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत. नागरिकांनी आपल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी.
जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत सरासरीच्या ८२ टक्के पाऊस झाला आहे. त्यात धर्माबाद तालुक्याने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. या ठिकाणी १०१ टक्के पाऊस झाला आहे. त्याचबरोबर ऑगस्ट अखेरीस आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगण्याची गरज आहे.