- नितेश बनसोडे
नांदेड : १९८३ सालच्या प्रलयंकारी महापुराने बाधित झालेल्या माहूर तालुक्यातील लिंबायत गावाला अद्याप अधिकृत स्मशानभूमी नाही. यामुळे येथील नागरिकांना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर दु:ख विसरून आधी त्याच्या अंत्यविधीसाठी जागा शोधण्याची वेळ येते.
लिंबायत हे गाव माहूर शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे. १५०० लोकसंख्या असलेले हे गाव १९८३ च्या महापुरानंतर पुनर्वसित झालेले आहे. यानंतरच्या ३४ वर्षात या गावाला अद्याप अधिकृत स्मशानभूमी नाही. यामुळे गावात जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मालकीच्या शेतातच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र; मात्र एखाद्या भूमिहीनाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकाला दु:ख सोडून अंत्यसंस्कारासाठी जागा शोधण्याची वेळ येते.
यावर गावच्या सरपंच आर.एस.दवणे यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गावाची हि समस्या कधीच गांभीर्याने न घेतल्याने वर हि परिस्थिती आली आहे असे मत व्यक्त केले. तर ग्रामस्थ सुभाष दवणे यांनी तहसील कार्यालय ते लोकप्रतिनिधी अशा सर्वांपुढे याबाबत मदत मागितली तरीही त्यांना कुणीही दाद नाही असे सांगितले. या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनीच गांभीर्याने लक्ष द्यावे असे सुनील शिंदे पाटील यांनी म्हटले आहे. तर ग्रामस्थांनी यापुढे तहसील कार्यालयात अंत्यसंस्कार करण्यात येतील असा इशारा दिला.