लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: मुदखेड ते उमरी जाणाऱ्या रस्त्यावर एका घराच्या अंगणात उभ्या असलेल्या वाहनात स्फोटक पदार्थांचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्या ठिकाणी धाड मारण्यात आली़ याप्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले आहेत़ यावेळी सव्वादोन लाख रुपये किमतीची स्फोटके जप्त करण्यात आली आहेत़ विहीर फोडण्यासाठी ही स्फोटके आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़ पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या आदेशावरुन सपोनि विनोद दिघोरे हे पथकासह २ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुदखेड शिवारात पोहोचले़ मुदखेड ते उमरी जाणाऱ्या रस्त्यावर नथ्थूलाल नंगोजीराम साळवी याच्या घराच्या अंगणात गाडीमध्ये स्फोटक पदार्थांचा साठा असल्याची त्यांना माहिती मिळाली होती़ त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत पथकाने घरावर वॉच ठेवला़ त्याचवेळी घरातून बाहेर आलेल्या देवीलाल चौघालाल साळवी रा़उमरी रोड याला पोलिसांनी ताब्यात घेतले़ त्यानंतर साळवी याला घेवून अंगणात असलेल्या महिंद्रा (क्र.एम़एच़२२- ३३६) या गाडीची तपासणी केली असता, त्यात स्फोटकाचा साठा आढळून आला़ त्यामध्ये एक्सप्लोजिव्हचे एकूण २० कागदी बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये ९ सोलार प्राईम कंपनीचे जिलेटीन, कागदी तीन बॉक्समध्ये एक्सप्लोजिव्हचे ५८४ नग सुपर पावर कंपनीचे जिलेटिन तोटे, एका नायलॉनच्या पोत्यावर आॅप्टीमेक्स नायट्रेट असे लिहिलेले होते़ त्यात अंदाजे ३६ किलो अमोनियम नायट्रेट होते़ त्याचबरोबर एक महिंद्रा कंपनीचे गाडी असा एकूण २ लाख २८ हजारांचा माल यावेळी जप्त करण्यात आला़ याप्रकरणी नथ्थूलाल नंगोजीराम साळवी, देवीलाल चौघालाल साळवी या दोघांना ताब्यात घेण्यात आले़ या पथकात दिघोरे यांच्यासह सपोनि भारती, पोहेकॉ़ धोंडिराम केंद्रे, पोहेकॉ़माधव केंद्रे, व्यंकटी केंद्रे, ब्रम्हानंद लामतुरे यांचा समावेश होता़
स्फोटक पदार्थांचा साठा सापडला
By admin | Published: June 06, 2017 12:16 AM