हदगाव : मनाठा वनपरिक्षेत्र परिमंडळात वन विभागाने हद्द आखाणीचे काम सुरू करताच एका शेतकऱ्याने त्यावर आक्षेप घेतला. ऐवढ्यावरच न थांबता शेतकऱ्याने काम थांबवले नाही तर विष प्राशन करण्याची धमकी दिली. यामुळे वन विभागाला काम थांबवून त्या शेतकऱ्यावर दिवसरात्र लक्ष ठेवण्याची वेळ आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनाठा येथिल शेतकरी शेख हिदायत अली यांनी गट क्रमांक ३८३ मधील पाच एकर शेती आपली असून त्याबद्दल महसूल विभागाचे पुरावे असल्याचे म्हटले आहे. तर वन विभागाने सुद्धा ही जमीन त्यांचीच असल्याचा दावा केला आहे. वनविभागाने तेथील अतिक्रमण काढून सन २०१९ मध्ये वृक्षलागवड केली. यामुळे मनाठा परिसरातील अनेक शेतकरी भुमीहीन झाले आहेत. काही गप्प बसले तर काहींनी कोर्टात दाद मागितली. कोर्टाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला. तेव्हा वन विभागाची जमीन महसूल विभागास गायरान देण्याचा अधिकार नसल्याचे सांगत त्यावर ताबा घेतला.
शुक्रवारी ( दि. १९) सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान गट क्रमांक ३८३ मधील जमिनीवर वनविभागाने काम सुरु केले. तेव्हा शेतकरी शेख हिदायत अली यांनी त्यास विरोध केला. काम थांबत नसल्याने शेवटी शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. यामुळे वन विभागाने काम बंद केले. तसेच शेतकऱ्याने चुकीचे पाऊल उचलू नये म्हणून एक चतुर्थ श्रेणी कर्मचारीच त्याच्या निगराणी ठेवला. दर एक तासाला वरिष्ठ शेतकऱ्याची माहिती घेत होते. आज दिवसभरात वन विभाग आणि शेतकरी दोघांच्या बाजू पोलिसांनी ऐकून घेतल्या. सध्या काम बंद असून न्यायालयाच्या पुढील आदेशाची प्रशासनास प्रतीक्षा आहे. या सर्व प्रकाराने वन विभागाची चांगलीच झोप उडाल्याची चर्चा रंगली होती.