नांदेड : महावितरण कंपनीकडून लॉकडाऊनकाळात अवाढव्य वीज बिले देण्यात आली असून या बिलांची सक्तीने वसुली सुरू आहे. बिल अदा न करणाऱ्या नागरिकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. हा प्रकार संतापजनक असून सरकारने तो तातडीने थांबवावा, अन्यथा जनतेतून उद्रेक होईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.
त्याच अनुषंगाने दरेकर यांनी येथील ‘महावितरण’च्या मुख्य कार्यालयात जावून अधिकाऱ्यांशी अर्धा तास चर्चा केली. जिल्ह्यातील महादेव पिंपळगाव येथे खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या दरेकर यांनी दुपारी नांदेड येथे बुद्धिजीवींसह व्यापारीवर्गाशी संवाद साधला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या वाढीव बिलासंदर्भात महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सक्तीची वीज बिल वसुली तातडीने थांबवा, मीटरमधील रिडींग तपासून वीजग्राहकांना योग्य ते वीज बिल द्या, नोटीस बजावल्याशिवाय ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करू नका, अशा सूचनाही दरेकर यांनी यावेळी दिल्या.
दरम्यान, खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महापालिकेतील काही सत्ताधारी नगरसेवक मटक्याचा व्यवसाय करत असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांकडूनच अवैध व्यवसाय करणाऱ्याला पाठबळ दिले जात असल्याचा आरोप करत हा प्रकार न थांबल्यास भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी आ. राम पाटील-रातोळीकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.