छोट्या सर्वेशच्या स्वप्नांना बळ; काल राहुल गांधींच्या भाषणात उल्लेख, आज हातात लॅपटॉप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 12:15 PM2022-11-11T12:15:25+5:302022-11-11T12:19:47+5:30
देशातल्या प्रत्येक मुलाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वप्न पूर्ण करावे.
नांदेड: भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेडच्या वाटेवर असताना राहुल गांधी यांना दोन मुलांनी सॉफ्टवेयर इंजीनियर व्हायचे बोलून दाखवले. पण आपण आजपर्यंत संगणक पाहिला नाही, आपल्या शाळेतही संगणक नसल्याचे सांगितले. याबाबत राहुल गांधी यांनी काल त्यांच्या भाषणात देखील उल्लेख केला. शाळेत संगणकच नाही तर या मुलाचे स्वप्न कसे पूर्ण होणार हे जाणून राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या मुलाला आज संगणक भेट दिला.
आता या मुलाच्या स्वप्नाला बळ मिळाले. पण ही एका मुलाची गोष्ट झाली, हिंदुस्थानमधील प्रत्येक मुलाचे स्वप्न साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशातल्या प्रत्येक मुलाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वप्न पूर्ण करावे. परंतु भाजपा सरकारच्या नाकर्तेपणामुळे लाखो मुले कोरोना काळात संगणक नसल्याने ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. भारत जोडो यात्रा अशा स्वप्नांना मुर्त रुप देण्याचे काम करत आहे, असे प्रतिपादन यावेळी खर्गे यांनी केले.
विमान, हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही
तेलंगणामधून भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल झाली आहे. देगलूर येथून काल दुपारी यात्रा नांदेड येथे दाखल झाली. सायंकाळी जाहीर सभेत राहुल गांधी यांनी केंद्र सरकार जोरदार टीका केली. विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही. आजघडीला देशातील सर्व पैसा तीन ते चार उद्योगपतींच्या घशात घालण्यात येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये संगणकसुद्धा नाहीत. इकडे पंपचे बटन दाबले की तिकडे तुमच्या खिशातील पैसा थेट उद्योगपतींकडे जातो, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या जाहीर सभेत हल्लाबोल केला.
...अन् मुलांना टॅब दाखविला
सॉफ्टवेअर इंजिनीअर बनण्याचे ध्येय असलेल्या विद्यार्थ्यांना जेव्हा राहुल गांधी यांनी कॉम्प्युटर बघितले का? असे विचारले, तेव्हा विद्यार्थ्यांनी नाही, असे सांगताच रस्त्याच्या एका कठड्यावर बसून राहुल गांधींनी या विद्यार्थ्यांना स्वत:जवळचा टॅब दाखविला. भारत जोडो यात्रा नांदेड शहराकडे येत असताना गुरुवारी हा प्रसंग घडला. त्यानंतर आज सकाळी या मुलांना राहुल गांधी यांच्या हस्तेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संगणक भेट दिला. यावेळी त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही.