नांदेड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून प्रार्दुभाव कमी करण्यासाठी प्रशासनाने २१ मार्चपर्यंत अंशता लॉकडाऊन लावला आहे. तसेच मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिग या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कठोर निर्बंध लावण्यात आले आहे. परंतु नांदेडात मात्र हे निर्बंध नावालाच असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरीक गर्दी करीत आहेत. लग्न समारंभातही नियमांचे उलंघन करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयातही ५० टक्के उपस्थितीच्या नियमांचा फज्जा उडविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
मनपा थकीत कर वसूलीच्या कामात
कोरोनारच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांच्या विरोधात महापालिकेकडून कारवाई करण्यात येते. परंतु सध्या महापालिका प्रशासन थकीत कर वसूलीच्या कामात मग्न आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केले तरी अद्याप कुणावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे बिनदिक्तपणे मास्क वापरण्यात येत नाही.
शहरातील चित्रपटागृहात ५० टक्के प्रेक्षकांची परवानगी आहे. परंतु कोरोनामुळे कोणतेही नवीन चित्रपट प्रदर्शित झाले नाही. त्यामुळे चित्रपटगृहे मात्र ओस पडली आहेत. अनेकांनी तर टाळेही उघडले नाही. त्यामुळे या ठिकाणी शांतता होती.
लग्नसराईसाठी ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु नांदेडात लग्नसराईमध्ये कोरोनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात येत आहे. हजारो नागरीकांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात लग्न सोहळे पार पडत आहेत.
अत्यंविधीसाठी २० जणांनाच परवानगी असताना गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीवर अत्यंविधीसाठी साधारणता पन्नासहून अधिक जण जमत आहेत. अत्यंयात्रेत सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
शासकीय कार्यालयात ५० टक्के उपस्थितीचा नियम आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका या ठिकाणी सर्वच विभागातील कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. कर्मचार्यांकडूनही नियमांचे पालन होत नव्हते.
शहरात शेकडो जण गृहविलगीकरणात आहेत. परंतु त्यांच्याकडे प्रशासनाचे कोणतेही लक्ष नाही. रुग्ण बरा झाल्यानंतर त्याची भ्रमणध्वनीवरुन विचारपूस करण्यात येते. औषधी आणि इतर अडचणींचाही विसर पडला आहे.