लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी विद्यार्थी वाहतूक दर वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याने संघटनेच्यावतीने वाहतूक दरात ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्कूल बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष निखील लातूरकर यांनी म्हटले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग कोरोनाविषयक नियम पाळून पूर्ववत सुरू होणार आहेत. नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरु झाले आहेत. महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाचे १५ जून २०२० व १० नोव्हेंबर २०२०च्या परिपत्रकानुसार हे वर्ग सुरु होणार आहेत. शासन नियमानुसार विद्यार्थी वाहतुकीसाठी आसन क्षमतेच्या दीडपट विद्यार्थी वाहतूक करता येते. पण कोरोना महामारीच्या काळात शासन नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आसन क्षमतेच्या ५० टक्के विद्यार्थी वाहतूक करावी लागणार आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी हे करावे लागणार असल्याचे संघटनेने आपल्या पत्रकात म्हटले आहे. परंतु, कोरोनामुळे पालकांचेही आर्थिक कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत दुप्पट वाहतूक शुल्क वाढवणे चुकीचे असून, ही आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.
कोरोना नियमानुसार विद्यार्थी वाहतुकीचे दर हे नाईलाजास्तव दुप्पट करावे लागणार आहेत. मागील १० महिन्यांपासून विद्यार्थी वाहतूक पूर्णपणे बंद असल्यामुळे विद्यार्थी वाहतूकदारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. पालकांनी सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सध्याची परिस्थिती असेपर्यंत व परिस्थिती सामान्य होईपर्यंत विद्यार्थी वाहतुकीचे दर दुप्पट देऊन सहकार्य करावे. कोरोना महामारीचा काळ संपताच व शासनाचा आदेश आला की, नियमाप्रमाणे दर पुन्हा पूर्ववत करण्यात येतील, असेही या पत्रकात म्हटले आहे.
चौकट
फायनान्स कंपन्यांना इशारा
कोरोना पार्श्वभूमीवर ओढवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या चालक, मालक यांना फायनान्स कंपन्यांनी हप्ते भरण्यासाठी सहकार्य करावे. कुठल्याही स्कूल बस, व्हॅन, मॅजिकच्या चालक-मालक यांची अडवणूक करू नये. अन्यथा सर्व फायनान्स कंपन्यांच्याविरोधात फार मोठे आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.