नांदेड : महापोर्टलच्या विरोधात सोमवारी स्पर्धा परीक्षा संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात तीन हजारांवर विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सहभाग होता़ महापोर्टल व सी-सॅट किमान अर्हता गुण, पोलीस भरती तसेच इतर मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़.
महात्मा फुले पुतळ्यापासून विद्यार्थ्यांच्या या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. यावेही विविध घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. महापरीक्षा महापोर्टल तात्काळ बंद करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर वर्ग ३ व ४ या पदांची भरती प्रक्रिया स्वतंत्र कर्मचारी आयोग नेमून करावी, महापोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांची सीबीआय चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावे, राज्य सेवा पूर्वपरीक्षा पद्धतीत बदल करून त्यातील सी-सॅट या विषयाचा पेपर यूपीएससीच्या धर्तीवर (किमान गुण ३३%) आधारित करावा, रिक्त असलेली तीन लाख पदे त्वरित भरावी, राजस्थान-तेलंगणा राज्याप्रमाणे सुशिक्षित बेरोजगारांना ५ हजार रुपये महिना बेरोजगारी भत्ता द्यावा, पीएसआय, एसटीआय, एएसओ इत्यादी पदांसाठीची संयुक्त परीक्षा पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणेच प्रत्येक पदासाठीची परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात यावी, पोलीस भरती पूर्वीप्रमाणेच घेण्यात यावी़ ५५ हजार पोलिसांची पदे त्वरित भरण्यात यावी, शिक्षक व प्राध्यापकांची रिक्त पदे केंद्रीय पद्धतीने आयोग नेमून भरावीत, एमपीएससी आयोगातील सदस्यसंख्या त्वरित भरण्यात याव्यात या प्रमुख मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महापोर्टलचा फटका बसत आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात असे मत सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
हजारो विद्यार्थ्यांचा सहभागमहात्मा फुले पुतळ्यापासून सुरु झालेल्या या मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सकाळपासूनच विद्यार्थी यायला सुरुवात झाली होती. शिवाजी पुतळामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ यात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता़
मोर्चाचे रुपांतर सभेत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी समितीचे अध्यक्ष बळवंत शिंदे, अतुल रांदड, उपाध्यक्ष अॅड. शिवाजी शिंदे, सचिव रविराज राठोड, संघटक किरण गायकवाड, वीरभद्र डखणे, राजेश बंगलवार, राजू पुप्पुलवाड, रमेश रोडगे, संभाजी लोहबंदे, गणेश ढगे, कैलास उपासे, बळवंत सावंत आदींची उपस्थिती होती़