नांदेड - जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पंधरा ते पंचवीस असलेल्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. अशाही परिस्थितीत उच्च प्राथमिक तथा माध्यमिक शाळा सुरु आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर या त्रिसुत्रीचा काटेकोरपणे अवलंब करावा, असे आवाहन शिक्षणविस्तार अधिकारी सरस्वती आंबलवाड यांनी केले आहे. त्या जवळा देशमुख येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी केंद्रप्रमुख अमीन पठाण, संतोष अंबुलगेकर, मुख्याध्यापक जी. एस. ढवळे, तपासणी अधिकारी एस. बी. कलणे, संतोष घटकार, केदारे, शेख आदी उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर यानिमित्ताने घेतलेल्या ‘आईचे पत्र सापडले’ या उपक्रमाची आंबलवाड यांनी माहिती घेतली.
विद्यार्थ्यांनी त्रिसुत्रीचा अवलंब करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:32 AM