नांदेड: जमिनीतून उर्ध्व पैनगंगेचा कालवा जात असल्याने सदर कालव्यासाठी भूसंपादन करुन शासनाचे नावे रजिस्ट्री करुन त्याच्या मोबदल्यासाठीचा चेक देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर उर्ध्व पैनगंगा उपविभाग क्रमांक १९ चे उपविभागीय अधिकारी नारायण यशवंत राऊत यांना नांदेडच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
भाऊ व वहिणीच्या नावे असलेल्या शेत जमिनीतून उर्ध्व पैनगंगेचा कालवा जात असल्याने या कालव्यासाठी सदर जमिनीचे भूसंपादन करुन शासनाच्या नावे रजिस्ट्री करावयाची होती. यासाठीच्या मोबदल्याचा चेक देण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३ सप्टेंबर रोजी प्राप्त झाली होती. या अनुषंगाने या विभागाने याची पडताळणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार गुरुवारी लाचलुचपत विभागाने रचलेल्या सापळ्यात उपविभागीय अधिकारी नारायण यशवंत राऊत अलगद सापडले. तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर या पथकाने राऊत यांना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भुजंग गोडबोले यांच्या नेतृत्वाखालील एकनाथ गंगातीर्थ, गणेश केजकर, दर्शन यादव, अंकुशा गाडेकर, शेख मुजीब यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.