नांदेड : आधुनिक काळात शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी बालविवाहासाठी आजही काही पालक तयार होत असल्याची बाब तालुक्याचे ठिकाण असलेल्या लोह्यात पुढे आली आहे. नांदेड चाईल्ड लाईन संस्थेला या बालविवाहाची माहिती मिळताच बालकल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाने लोहा पोलिसांच्या मदतीने हा बालविवाह गुरूवारी रोखला.
लोहा शहरात एका १५ वर्षीय बालिकेचा विवाह होत असल्याची माहिती नांदेड चाईल्ड लाईन संस्थेच्या १०९८ या क्रमांकावर प्राप्त झाली. ही माहिती चाईल्ड लाईनने बालकल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाला दिली. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी विद्या आळणे, चाईल्ड लाईनचे बी.व्ही. आलेवार, निता राजभोज, आकाश मोरे यांनी थेट लोहा गाठले. लोह्यात सदर घटनेची माहिती घेवून पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांना मदतीला घेत मुलीच्या पालकाशी संपर्क साधला. मुलीचे वडिल व नातेवाईकांना या बालविवाहाच्या परिणामाची माहिती देण्यात आली. मुलीच्या वडिलांनीही सदर बालविवाह अजाणतेपणी करीत असल्याची कबुली दिली. मुलीचा विवाह १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच करेल असे आश्वासन दिले.
नगरसेवक व वार्ड बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष करीम महोदीम शेख यांनीही सदर बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास नांदेड चाईल्ड लाईन संस्थेच्या १०९८ या क्रमांकावर तसेच महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेखा काळम यांनी केले आहे.