नांदेड : नायगाव तालुक्यातील नरसी येथे येत्या ७ जानेवारी होत असलेल्या ओबीसी जनमोर्चा आयोजित ओबीसी महामेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून तब्बल पाच हजार स्वयंसेवक त्यासाठी नियुक्त केले आहेत. या मेळाव्याला जिल्हाभरातून लाखो ओबीसी समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती ओबीसी नेते ॲड. अविनाश भोसीकर यांनी पत्र परिषदेत दिली.
ॲड. भोसीकर म्हणाले, नांदेडात पहिल्यांदाच अशाप्रकारे ओबीसींचा महामेळावा होत आहे. त्यासाठी संपूर्ण बहुजन समाज एकवटला आहे. मंत्री छगन भुजबळ, वंचितचे बाळासाहेब आंबेडकर, प्रकाशअण्णा शेंडगे, गोपीचंद पडळकर, माजी मंत्री विनय कोरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, टी.पी. मुंडे, बबनराव तायवाडे यांच्यासह अनेक ओबीसी नेते मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात जवळपास ६५ टक्केपेक्षा अधिक ओबीसी समाज आहे. त्यामुळे या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव येतील, असा विश्वासही भोसीकर यांनी व्यक्त केला. यावेळी नामदेवराव येईलवाड, भास्कर तळणे, श्रीहरी मुंडकर, ॲड. प्रदीप राठोड, नंदकुमार कोसबतवार यांची उपस्थिती होती.
वेगवेगळ्या २१ समित्या स्थापन
गेल्या महिनाभरापासून ओबीसी महामेळाव्याची तयारी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४५ जिल्हा परिषद सर्कलचे दौरे पूर्ण करण्यात आले आहेत. मेळाव्याच्या नियोजनासाठी २१ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मेळाव्याच्या ठिकाणी तब्बल एक लाख पाणी बॉटल आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मेळाव्याच्या ठिकाणी ५० बाय १०० आणि ४० बाय ३० या आकाराचे दोन व्यासपीठ उभारण्यात येणार आहेत. यापैकी एका व्यासपीठावर शाहिरीचा कार्यक्रम चालणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र देमगुंडे यांनी दिली.