देगलूर (नांदेड) : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या तेलंगाणा राज्याच्या सीमेपासून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. त्या दृष्टीने जयत तयारी केली जात आहे.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचे आगमन ७ नोव्हेंबर रोजी देगलूरपासून महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याने या भागातील सर्वसामान्य नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तेलंगाणामार्गे महाराष्ट्रात प्रवेश होणार आहे. सीमेवर त्यांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे आदींची उपस्थिती राहणार आहे. शहरातील शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी सभेत राहुल गांधी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून शहरातील नवीन बसस्थानकापासून शंकरनगर मार्ग पदयात्रेला सुरुवात होणार आहे.
या पदयात्रेच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच वाहतुकीच्या प्रश्नावर उपाययोजना करण्याबाबत देगलूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात २ नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, तेलंगाणातील कामारेड्डीचे पोलीस अधीक्षक यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला नांदेडचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह लातूर, हिंगोली व तेलंगणा राज्यातील निर्मल, निजामाबाद, कामारेड्डी येथील पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आदीची उपस्थिती होती. दरम्यान, भारत जोडा यात्रेच्या निमित्ताने शहरातील रस्ते साफसफाई तसेच प्रमुख रस्त्यावरील दुभाजकांना रंगरंगोटीचे काम केले जात आहे. मागील आठ दिवसापासून दोन एकर खुल्या मैदानाची सफाई करण्यात येत आहे.
३०० अधिकारी, दीड हजार पोलीसांचा बंदोबस्तया भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार असून, तेलंगाणा सीमेपासून राहुल गांधी यांना महाराष्ट्र पोलीस सुरक्षा पुरविणार आहेत. त्यासाठी मुंबईहून अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी यांच्यासह नांदेडचे पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह नांदेडचे वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. एकूण ३०० पोलीस अधिकारी व सुमारे १ हजार ५०० पोलीस कर्मचारी यांसह वाहतूक शाखेचे अधिकारीही या यात्रेदरम्यान उपस्थित राहणार आहेत.