शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी शासनाने परवानगी दिली नाही, पण या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षकांना काय करता येईल याबाबत विचार करावा, असे आवाहन सभापती बेळगे यांनी केले. तसेच शिक्षक शाळेत नियमित उपस्थित राहतील, याची दक्षता घ्यावी. नवीन पुस्तके अद्याप प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे जुनी पुस्तके विद्यार्थ्यांकडून घेऊन इतर विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करावे, असे आवाहनही त्यांनी केले. गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांना भेटी देण्यासाठी तालुकास्तरावर नियोजन करावे. गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी शाळांना भेटी देऊन गावातील विद्यार्थ्यांचे शिक्षण कशाप्रकारे पूर्ण करता येईल, याबाबत विचार करा. भेटी दिल्यानंतर सदर भेटींच्या फोटोज ग्रुपवर अपलोड करा, अशी सूचना शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी दिली.
प्रास्ताविक प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले. जिल्हा नियोजन समितीकडून अजून निधी प्राप्त झालेला नाही. परंतु निधी प्राप्त होईल तत्पूर्वी आवश्यक नियोजन करण्याची सूचना लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी केली. उमरी तालुक्यातील हुंडापट्टी व माहूरमधील वाई बाजार येथे माध्यमिक शाळेची गरज असल्याचे सांगण्यात आले.
शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग प्राथमिकच्या वतीने आई-बाबांची शाळा हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. उपशिक्षणाधिकारी डी. एस. मठपती यांच्या कार्याचे कौतुक झाले. सेमीची माध्यमाची पुस्तके मागणीप्रमाणे देण्याचे निवेदन साहेबराव धनगे यांनी केले. व्यंकटराव पाटील गोजेगावकर, संध्याताई धोंडगे, अनुराधा पाटील, लक्ष्मण ठक्करवाड, साहेबराव धनगे यांनी चर्चेत सहभाग घेतला. प्रत्येक तालुकास्तरावर किमान एक इंग्रजी शाळा स्थापन करण्याच्या चर्चा होऊन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
बैठकीस माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, सहायक कार्यक्रम अधिकारी विलास ढवळे उपस्थित होते.