नांदेड - भारतीय वनविभागाच्या (IFS ) मुख्य परीक्षेत नांदेड येथील सुमित दत्ताहरी धोेत्रे यांनी देशातून ६२ वा क्रमांक मिळवित मोठे यश संपादन केले आहे.
आयएफएस मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. सप्टेंबर महिन्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC ) परीक्षेत यश संपादन केल्यानंतर सुमित धोत्रे यांनी हे दुसरे यश मिळविले आहे. नांदेड येथील सामान्य कुटुंबातील पत्रकार दत्ताहरी धोत्रे यांचे सुमित धोेत्रे हे सुपुत्र आहेत. यूपीएससीच्या अंतिम परीक्षेत सुमित्र धोेत्रे यांनी पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केले होते. देशातून ६६० रँकिंग घेऊन ते उत्तीर्ण झाले होते.
महिन्याभरातच त्यांनी हे मोठे यश मिळविले आहे. सुमित यांचे शिक्षण नांदेड येथे झाले असून, त्यांनी दहावीपर्यंत वेगवेगळ्या १२७ स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत. त्यात त्यांना ११ सुवर्णपदक मिळाले आहेत. यापूर्वी त्यांनी आयआयटी खरगपूर येथून इलेक्ट्रॉनिक्समधून बी.टेक. पदवी संपादन केली आहे. त्यानंतर नामांकित कंपनीत मोठ्या पॅकेजवर काम करीत असताना त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन यूपीएससी परीक्षेची तयारी केली.