शहरातील काही रस्त्यावरच बॅरिकेटस्
नांदेड - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन् जाहीर करण्यात आल्यानंतर शहरातील काही रस्ते बॅरिकेटस् लावून बंद करण्यात आले होते. यापैकी काही रस्ते वाहतुकीसाठी पूर्ववत खुले करण्यात आले. काही रस्ते मात्र अद्यापही बंद आहेत. हे रस्ते बंद करण्यामागील उद्देश काय, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक होत असून, अनेकदा अपघात होत आहेत.
स्वच्छता कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी
नांदेड - महापालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने साफसफाई विभागातील कर्मचाऱ्यांची तपासणी ८ मे रोजी करण्यात आली. आठवडी बाजार परिसरात सहायक आयुक्त रावण सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली लिपिक नागेश ऐकाळे, मोहन पोवळे, अर्जुन बागडीया आदींची उपस्थिती होती.
लसीबाबत जनजागृती करावी
नांदेड - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पूर्ण मानव जीवन उदध्वस्त केले आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करतानाच लसीकरणाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले आहे. श्रामणेर प्रशिक्षण केंद्र, खुरगाव नांदुसाचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी शासकीय रुग्णालयात लस घेतली. यावेळी त्यांनी आवाहन केले.
परिवहन विभागाचे महसूलचे उद्दिष्ट पूर्ण
नांदेड - कोरोना काळात प्रादेशिक परिवहन विभागाने २०२०-२१ या आर्थिक वर्षात शंभर टक्के महसूल उद्दिष्ट पूर्ण केले आहे. नांदेड विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात १४८ कोटी १ लाख रुपये रकमेचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे. विभागास शासनाकडून देण्यात आलेल्या ११७ कोटी उद्दिष्टाच्या तुलनेत १२६ टक्के उद्दिष्ट प्राप्त केले आहे. या आर्थिक वर्षात आकर्षक, पसंतीच्या वाहन वाटपातून सुमारे १ कोटी ७२ लाख रुपये महसूल जमा झाला आला.